दिल्या-घेतल्याचा हिशेब ठेवत नाही

By Admin | Published: May 5, 2016 12:05 AM2016-05-05T00:05:42+5:302016-05-05T00:11:13+5:30

बीड : दुष्काळग्रस्तांना मदत करताना शिवसेनेने फक्त प्रश्न पाहिले. बीडच्या लोकांनी एकही आमदार निवडून दिला नाही, म्हणून बीडमध्ये मदत करायची नाही,

Do not keep track of-taking | दिल्या-घेतल्याचा हिशेब ठेवत नाही

दिल्या-घेतल्याचा हिशेब ठेवत नाही

googlenewsNext

बीड : दुष्काळग्रस्तांना मदत करताना शिवसेनेने फक्त प्रश्न पाहिले. बीडच्या लोकांनी एकही आमदार निवडून दिला नाही, म्हणून बीडमध्ये मदत करायची नाही, हे शिवसेनेचे धोरण नाही. तुम्ही दिलं तर आम्ही देऊ. हा हिसाब- किताब शिवसेना कधीच ठेवत नाही, असे प्रतिपादन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे बुधवारी जाहीर सभेत केले.
शहरातील बायपास रस्त्यावरील शिवपुत्र संभाजी महानाट्यनगरीत शिवसेनेच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाण्याच्या टाक्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आयोजित सभेला ते संबोधित करत होते. खा. चंद्रकांत खैरे, पर्यावरणमंत्री रामदास कदम, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, आ. अर्जुन खोतकर, आ. नीलम गोऱ्हे, माजी आ. सुनील धांडे, संपर्कप्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे आदी उपस्थित होते. मी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या भेटीला आलो आहे, कोणावर टीका करायला अन् टाळ्या घ्यायला नाही, असे सभेच्या सुरुवातीलाच स्पष्ट करुन त्यांनी शिवसेनेने दुष्काळात शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा लेखाजोखा मांडला. शेतकरी आत्महत्येमागच्या अनेक कारणांत मुला- मुलींच्या लग्नाचा प्रश्नही आहे. त्यामुळे तुम्ही सोयरीक जुळवा आम्ही कन्यादान करु, अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. मराठवाड्यात सामूदायिक विवाह सोहळ्यातून ८०० वर मुला- मुलींचे लग्न लावली, याचे समाधान आहे, असेही ते म्हणाले.
दुष्काळात पाणी साठविण्याची अडचण असल्यामुळे शिवसेनेने मराठवाड्यात टँकर व टाक्या वाटपाचा निर्णय घेतला, असे ते म्हणाले. मराठवाड्यातील जनता दुष्काळात होरपळत आहे. पाऊस नक्की येईल, असा आशावाद व्यक्त करून त्यांनी शेतकऱ्यांना धीर धरा, आत्महत्येचा मार्ग निवडू नका, आपल्याच लेकराबाळांना उघडे पाडू नका, असे भावनिक आवाहन केले.
तुळजापूरात आपण तुळजाभवानीला पावसासाठी साकडे घातले आहे. संकटाचा हा काळ आहे. अशा काळात सर्वांनी एकत्रित यायचे असते. टीका करण्यापेक्षा माणुसकीने जगा, असे आवाहन त्यांनी केले.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांबाळांच्या शिक्षणासह कुटुंबियांचे अनेक प्रश्न आहेत. शिवसेना सर्वतोपरी मदत करीत आहे. संकटकाळात शिवसेना कायम धावून गेलेली आहे. यापुढेही शिवसेना गरजवंतांची मदत पुरवेल, असे आश्वासन त्यांनी दिले. प्रास्ताविक जिल्हाप्रमुख जगताप यांनी केले.
यावेळी जि. प. सदस्य किशोर जगताप, बाळासाहेब जटाळ, सुदर्शन धांडे, सुशील पिंगळे, कुंडलिक खांडे, नितीन धांडे आदी उपस्थित होते.
जनता समाधानी, तेव्हा मी समाधानी
सत्तेत असल्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का ? असा प्रश्न मला नेहमी विचारला जातो. जनता जोपर्यंत समाधान व्यक्त करीत नाही तोपर्यंत मी कसे समाधान व्यक्त करणार ? असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
फक्त उद्धव ठाकरेंचेच भाषण
सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेच एकमेव भाषण झाले. मंचावर दोन मंत्री, दोन आमदार, एक खासदार उपस्थित होते. मात्र, त्यांना भाषणाची संधी दिली नाही. सभा आटोपून ठाकरे यांचा ताफा औरंगाबादला रवाना झाला.
सहा टेम्पो भरून टाक्या
शिवसेनेच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी सहा टेम्पो भरून पाण्याच्या मोठ्या टाक्या मागविल्या होत्या. आ. नीलम गोऱ्हे व इतर मान्यवरांच्या हस्ते टाक्यांचे वितरण झाले. (प्रतिनिधी)
गौरवोद्गार : शिवजलक्रांतीची कामे दर्जेदार
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दुष्काळी परिस्थितीत शिवसेनेने हाती घेतलेल्या शिवजलक्रांती योजनेच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. शिवसैनिक चांगली मेहनत करीत आहेत, असे गौरवोद्गार काढून त्यांनी उदाहरणादाखल सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील माजी आ. राजाभाऊ राऊत यांचा नामोल्लेख केला. नदी खोलीकरण, रुंदीकरणाची दर्जेदार कामे केली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पाणी साचून कोरडवाहू क्षेत्र ओलिताखाली येईल, असे ते म्हणाले.
बीड तालुक्यातील चौसाळा येथील काम पाहिले. ते देखील चांगले असल्याचा शेरा त्यांनी दिला.
दुष्काळातून आपण काही शिकणार आहोत की नाही ? असा सवाल उपस्थित करून त्यांनी जलसंधारणासाठी शिवसेना शिवजलक्रांती योजनेच्या माध्यमातून सरसावल्याचा उल्लेख केला. यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणावर निधी वाचल्याचेही ते म्हणाले.

Web Title: Do not keep track of-taking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.