पद्मावत चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नका; करणी सेनेचे औरंगाबाद पोलीस आयुक्तांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 06:28 PM2018-01-22T18:28:17+5:302018-01-22T18:43:44+5:30
इतिहासाची मोडतोड करून तयार करण्यात आलेल्या पद्मावत चित्रपटामुळे जनभावना दुखावल्या आहेत. यामुळे हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास समाज आक्रमक होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन पद्मावत चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नका,अशी विनंती राजपूत करणी समाजाने पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे केली.
औरंगाबाद : इतिहासाची मोडतोड करून तयार करण्यात आलेल्या पद्मावत चित्रपटामुळे जनभावना दुखावल्या आहेत. यामुळे हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास समाज आक्रमक होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन पद्मावत चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नका,अशी विनंती राजपूत करणी समाजाने पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे केली.
पद्मावत चित्रपटाला राजपूत समाजाकडून विविध राज्यात विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर श्री राजपूत करणी सेनेच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांची आज भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांना निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी पद्मावत चित्रपट हा वादग्रस्त चित्रपट आहे. या चित्रपटात पद्मावती मातेला नृत्य करताना दाखवून विकृत इतिहास मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे राजपूत समाजाचा भावना दुखावल्या आहे. ही बाब लक्षात घेऊन औरंगाबाद शहरात पद्मावत चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नका,अशी भावना येथील श्री राजपूत समाजाची असल्याचे शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांना सांगितले. चित्रपट प्रदर्शित झाल्यास समाज आक्रमक होण्याची शक्यता असल्याने शहरात शांतता राहण्यासाठी शहरात चित्रपट प्रदर्शित होऊ देऊ नका,अशी विनंती करण्यात आली.यावेळी राजपूत करणी सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद सिंह पवार, विनोद राजपूत, महेंद्रसिंह ठाकुर, पारस राणा, विलास पाटील यांची उपस्थिती होती.
विविध समाज संघटनांचा करणी सेनेला पाठिंबा
पद्मावत चित्रपट प्रदर्शित करू नये, या राजपूत करणी सेनेच्याच्या मागणीला विविध मराठा संघटना आणि अन्य समाज संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. या विषयीचे निवेदनही पोलीस आयुक्तांना शिष्टमंडळाने दिले. यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे अप्पासाहेब कुढेकर, ब्राम्हण महासंघाचे सुधीर नाईक, बजरंग दलाचे कन्हैयासिंह राजपूत, मुस्लीम विकास परिषदचे लतीफ पटेल, ब्राम्हण समाज समन्वय समितीचे अशिष सुरडकर, शिवक्रांती सेनेचे सुनील कोटकर, रमेश केरे, राजपूत संघाचे प्रविण सिंह यांची उपस्थिती होती.
निवेदनकर्त्यांना नोटीसा
पद्मावत चित्रपटाला विरोध असल्याचे पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे कळविणार्या श्री राजपूत करणी सेना आणि राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या पदाधिकार्यांसह त्यांना पाठिंबा देणार्या विविध संघटनांच्या पदाधिकार्यांना नोटीसा बजावण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी विशेष शाखेच्या पोलीस अधिकार्यांना दिले. कायदेशीर मार्गाने चित्रपटाला विरोध करा, कायदा हातात घ्याल तर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा यावेळी पोलीस आयुक्तांनी शिष्टमंडळाला दिला.