औषधीतर नाहीच टेस्टही बाहेरच करा, नसता पेशंट घेऊन जा; कधी होणार आरोग्य व्यवस्थेत बदल?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 06:30 PM2023-10-10T18:30:26+5:302023-10-10T18:32:00+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी छत्रपती संभाजीनगर अंतर्गत पैठण येथे ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण पथक नावाने ३० बेडचे रूग्णालय आहे.

Do not only the medicine but also the test outside, otherwise take the patient; incident in Government Hospital, Paithan | औषधीतर नाहीच टेस्टही बाहेरच करा, नसता पेशंट घेऊन जा; कधी होणार आरोग्य व्यवस्थेत बदल?

औषधीतर नाहीच टेस्टही बाहेरच करा, नसता पेशंट घेऊन जा; कधी होणार आरोग्य व्यवस्थेत बदल?

पैठण: बाहेरून रक्त तपासणी करा,औषधेही बाहेरून खरेदी करून आणा नाहीतर तुमचे पेशंट येथून घेऊन जा, असा दम पैठण येथील शासकीय रुग्णालयात रूग्णांच्या नातेवाईकांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी भरला. आमच्याकडे ऐवढे पैसे नाहीत म्हणून आम्ही सरकारी दवाखान्यात आलो सरकारी दवाखान्यातच रक्त तपासणी करा अशी विनंती सुनेला प्रसूतीसाठी कारकीन येथून घेऊन आलेले अब्दुल शेख करत होते. मात्र, कुणी ऐकण्यास तयार नव्हते. शेवटी नाईलजाने दाम मोजून खासगी प्रयोग शाळेतून अब्दुल शेख यांना रक्त तपासणी करून आणावी लागली.  

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी छत्रपती संभाजीनगर अंतर्गत पैठण येथे ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण पथक नावाने ३० बेडचे रूग्णालय आहे. रक्त तपासणी प्रयोग शाळेपासून ते आधुनिक शस्त्रक्रियागार, ऑक्सिजन प्लान्ट, व्हेंटिलेटर  व तंञज्ञ या रूग्णालयात उपलब्ध आहेत. परंतु वैद्यकीय सेवेसाठी रूग्णांना बाहेरचा रस्ता दाखवला जातो. यामुळे शासनाने दिलेल्या सुविधांचा लाभ मिळत नसल्याचे समोर आले आहे. मंगळवारी लोकमत प्रतिनिधीने रूग्णालयास भेट दिली असता तेथे रूग्णाचे नातेवाईक व वैद्यकीय अधिकाऱ्यात वाद सुरू होता. दरम्यान याबाबत जाणून घेतले असता कारकीन येथील अब्दुल शेख त्यांची सून अफसाना अलताफ शेख हिला प्रसूती करीता घेऊन आले होते. यावेळी सुनेची रक्ततपासणी रूग्णालयाच्या प्रयोगशाळेतच करा अशी विनंती शेख करत होते. तर, प्रसुतीसाठी आलेल्या महिलांची बुधवारीच रूग्णालयात रक्त तपासणी केली जाते, बाहेरून रक्त तपासणी करून आणा नाहीतर पेशंट येथून घेऊन जा, असे वैद्यकीय अधिकारी सांगत होते. शेवटी खासगी लॅब वाल्यास रूग्णालयात बोलावून ५०० रू दाम मोजून अब्दुल शेख यांनी सुनेचे रक्त तपासून घेतले. 

प्रसुतीसाठी बाहेरून औषधे आणली
शहरातील कावसान येथील जया दिपक ठाकरे यांना सोमवारी रात्री मुलगी झाली. त्यांना ७०० रूपयाची औषधे बाहेरून खरेदी करून आणावी लागली. विशेष म्हणजे बाहेरून खरेदी केलेली औषधे तेथील नर्सने ताब्यात घेतली. या दोन्ही घटना पैठण येथील रूग्णालयातील कारभाराचे पितळ उघड करणाऱ्या आहेत. विशेष म्हणजे साधे पिण्यासाठी पाणी सुध्दा रूग्णालयात उपलब्ध नाही. कर्मचारी विकतचे जार विकत घेऊन तहान भागवतात.

रूग्णांना रेफर करण्याचे प्रमाण मोठे
दि १० ऑक्टोबर पर्यंत पुरेल एवढाच औषधांचा साठा असल्याने रूग्णालयाचे प्रपाठक डॉ गौतम सव्वासे यांनी घाटीचे अधिष्ठाता, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे औषधांची मागणी केली होती परंतु सोमवारपर्यंत कोणत्याच यंत्रणेकडून औषधांचा पुरवठा रूग्णालयास झालेला नव्हता. रूग्णालयाची रूग्णवाहिका भंगारात निघाल्या नंतर नवीन रूग्णवाहिका उपलब्ध झालेली नाही. रूग्णांना रेफर करण्याचे प्रमाणही मोठे आहे. कोट्यवधी रूपये खर्चून रूग्णालयात करण्यात येत असलेल्या कामाचा दर्जाही निकृष्ट आहे. दरम्यान, रूग्णालयाचे प्रपाठक शासकीय कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे गेले आहेत असे रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. 

Web Title: Do not only the medicine but also the test outside, otherwise take the patient; incident in Government Hospital, Paithan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.