दुसऱ्या डोसला थोडा विलंब झाला तर घाबरू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:07 AM2021-05-05T04:07:06+5:302021-05-05T04:07:06+5:30
औरंगाबाद : केंद्र शासनाने ४५ पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना पहिल्या टप्प्यात मुबलक प्रमाणात लस उपलब्ध करून दिली. आता दुसरा ...
औरंगाबाद : केंद्र शासनाने ४५ पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना पहिल्या टप्प्यात मुबलक प्रमाणात लस उपलब्ध करून दिली. आता दुसरा डोस घेण्याची वेळ आली तर केंद्र शासनाने हात वर केले. एकट्या औरंगाबाद शहरात तब्बल ४० हजारपेक्षा अधिक नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना वेळेवर लस न मिळाल्यास पहिला डोस वाया जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे; परंतु डोसला थोडासा विलंब झाला तर घाबरण्याचे कारण नाही.
औरंगाबादेत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. फ्रन्टलाइन लाइन वर्कर, हेल्थलाइन वर्कर, ४५ वर्षांवरील विविध आजार असलेले नागरिक, ६० पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना लस देण्यात येत होती. औरंगाबाद शहरात जवळपास २ लाख ३६ हजार नागरिकांना पहिला डोस देण्यात आला. आज ४० हजारांहून अधिक नागरिकांना दुसरा डोस देणे बाकी आहे. मात्र केंद्र शासनाकडून लसीचा पुरवठा करण्यात येत नाही.
आणखी काही दिवस लस उपलब्ध न झाल्यास नागरिकांचा पहिला डोस वाया जाण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना लस देण्याची जबाबदारी राज्य शासनाने स्वीकारली. दररोज फक्त ३०० नागरिकांना लस देण्यात येत आहे.
दोन दिवसाचा साठा
महापालिकेच्या आरोग्य विभागाला मंगळवारी ४५ पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांसाठी लसींचे फक्त ६ हजार डोस उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे शासनाने सांगितले. दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे. दोन दिवस पुरेल एवढाच हा साठा आहे. त्यानंतर महापालिकेला पुन्हा लसीकरण बंद करावे लागणार आहे.
चार ते आठ दिवस मागे पुढे झाले तर...
पहिला डोस घेतल्यानंतर नागरिकांनी किमान ६ आठवड्यानंतर दुसरा डोस घेतला पाहिजे, असे निकष ठरविण्यात आले आहेत. मागील काही दिवसांपासून लस उपलब्ध नसल्याने लसीकरण मोहीम बंद करण्यात आली आहे. शासनाकडून जशी लस प्राप्त होत आहे ती दुसऱ्या डोससाठी राखीव ठेवण्यात येत आहे. एखाद्या नागरिकाला डोस घेण्यात चार ते आठ दिवस उशीर झाला तरी घाबरण्याचे काही कारण नाही.
डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी महापालिका.
एक नजर लसीकरण मोहिमेवर
पहिला डोस घेतलेले - दुसरा डोस घेतलेले
२६,६९० - आरोग्यसेवक- १२,१७५
३३,४७५ - फ्रन्टलाइन वर्कर - ८,८००
५६,४८१ - ज्येष्ठ नागरिक - १५,३३६
७३,२६२ - ४५ पेक्षा जास्त- ९,६८१