दुखण्यावर स्वत:च्या मनाने औषधोपचार नको, वारंवार पेनकिलरने वाढतो ‘अल्सर’चा धोका!

By संतोष हिरेमठ | Published: October 6, 2023 05:43 PM2023-10-06T17:43:19+5:302023-10-06T17:43:19+5:30

कोणत्याही छोट्या मोठ्या दुखण्यासाठी स्वतःच डॉक्टर बनून औषधी दुकानांवरून वाटेल त्या गोळ्या घेण्याचे प्रमाण अधिक आहे.

Do not self-medication for pain, repeated use of painkillers increases the risk of 'ulcer'! | दुखण्यावर स्वत:च्या मनाने औषधोपचार नको, वारंवार पेनकिलरने वाढतो ‘अल्सर’चा धोका!

दुखण्यावर स्वत:च्या मनाने औषधोपचार नको, वारंवार पेनकिलरने वाढतो ‘अल्सर’चा धोका!

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : डोके दुखते म्हणून घे पेनकिलर, गुडघे दुखतात म्हणून घे पेनकिलर... असे तुम्ही वेगवेगळ्या दुखण्यावर स्वत:च्या मनाने वारंवार पेनकिलर घेत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण अशा प्रकारे वारंवार पेनकिलर घेतल्याने अल्सर होऊन पोटाचे आरोग्य बिघडण्याचा धोका वाढतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.

कोणत्याही छोट्या मोठ्या दुखण्यासाठी स्वतःच डॉक्टर बनून औषधी दुकानांवरून वाटेल त्या गोळ्या घेण्याचे प्रमाण अधिक आहे. यातूनच अनेकदा दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. त्यामुळे डोकेदुखीसारख्या सामान्य वेदनेसाठीही डॉक्टरांचा सल्ला घेणे हिताचे ठरते, असे तज्ज्ञांनी सांगितले.

वारंवार पेनकिलर नकोच
काहीजण छोट्या-छोट्या दुखण्यासाठी सरळ पेनकिलर घेऊन मोकळे होतात, तर अनेकांना पेनकिलर घेण्याची सवयच लागते. परंतु, अशा प्रकारे वारंवार पेनकिलर घेता कामा नये, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.

अल्सरचा धोका कुणाला?
कोणत्याही दुखण्यावर डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय वारंवार पेनकिलर घेणाऱ्या व्यक्तीला अल्सरचा धोका वाढतो. त्याबरोबरच किडनी, लिव्हरसह विविध आजार असणाऱ्यांनी पेनकिलरचे सेवन टाळावे. अशांना अल्सरचा अधिक धोका असतो.

अल्सरचे प्रकार
पोट व लहान आतड्याचा अल्सर : यात पोटात दुखते, ॲसिडिटीचा त्रास होतो. शौच, उलटीतून रक्त जाते.
मोठ्या आतड्याचा अल्सर : यात शौचावाटे रक्तस्राव होतो. व्यक्तीला ॲनिमिया होतो.
अन्ननलिकेचा अल्सर : अन्ननलिकेच्या अल्सरमध्ये छातीत दुखणे व अन्न गिळण्यास त्रास होतो.

काय काळजी घ्याल?
कोणत्याही दुखण्यावर स्वत:च्या मनाने पेनकिलर घेता कामा नये. आहारात मसालेदार, तिखट पदार्थांचे सेवन टाळावे. मद्यपान, तंबाखू, सिगारेट इ. व्यसनांपासून दूर राहावे.

डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी नकोत
पेनकिलरमुळे अल्सरचा धोका वाढतो. डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय पेनकिलरसह कोणत्याही औषधी गोळ्या घेता कामा नये. किडनी विकार, लिव्हरचे आजार आणि इतर आजार असणाऱ्यांनी स्वत:च्या मनाने पेनकिलर घेऊ नयेत. - डाॅ. राहुल तळेले, पोटविकारतज्ज्ञ

Web Title: Do not self-medication for pain, repeated use of painkillers increases the risk of 'ulcer'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.