दानवेंसारखी जीभ घसरणारे नेते नकोत, शब्दांचा सुटलेला बाण अचूक हवा; शिवसेनेचे वक्ता प्रशिक्षण शिबीर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 06:57 AM2018-07-09T06:57:20+5:302018-07-09T06:57:36+5:30
शिवसेनेला उत्कृष्ट वक्त्यांची फौज लागणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासारखी जीभ घसरणारे वक्ते नकोत.
औरंगाबाद - शिवसेनेला उत्कृष्ट वक्त्यांची फौज लागणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासारखी जीभ घसरणारे वक्ते नकोत. एकदा तोंडातून शब्दांचा सुटलेला बाण अचूक असला पाहिजे, अशा शब्दांत शिवसेना पक्ष समन्वयक मारोतराव साळुंके यांनी वक्ता प्रशिक्षण शिबीरात लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
शिवसेनेतर्फे औरंगाबाद, बीड आणि लातूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकाºयांसाठी वक्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन शहरातील भानुदासराव चव्हाण सभागृहात करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन शिवसेना नेते खा. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते झाले.
साळुंके म्हणाले, शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाची बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी वक्त्यांची गरज आहे. उत्कृष्ट वक्ता निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत.
संपर्क प्रमुखांना आठवेना जि.प.अध्यक्षांचे नाव
औरंगाबादचे शिवसेना संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर यांनी मार्गदर्शनाला सुरुवात करताना सर्वांची नावे घेतली. यात जि. प. अध्यक्षांचे नावच त्यांना आठवेना, तेव्हा व्यासपीठासमोरील पदाधिकाºयांनी नाव सांगितले. डोणगावकर आपण संपर्कात नसता. यामुळे नाव लक्षात राहिले नसल्याचे स्पष्टीकरण घोसाळकर यांनी दिले. या प्रसंगामुळे सभागृह अवाक् झाले.
जनतेला ‘हँग’ करा
उद्घाटन सत्रानंतर जिल्हाप्रमुखांनी मनोगत व्यक्त केले. यात लातूरचे जिल्हाप्रमुख नागेश सूर्यवंशी म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनतेसाठी काय केले, हे सतत सांगितले पाहिजे. दुष्काळात शिवसेना मदतीला धावून आली हे सांगून सांगून जनता हँग झाली पाहिजे, असे म्हणताच सभागृहात हशा पिकला.