एटीएम पळविणाऱ्या टोळीचा तीन दिवसांनंतरही माग लागेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 07:27 PM2019-07-16T19:27:03+5:302019-07-16T19:30:18+5:30

पोलिसांनी देशभरातील चोऱ्यांची माहिती मागविली

Do not track after three days of the ATM gang | एटीएम पळविणाऱ्या टोळीचा तीन दिवसांनंतरही माग लागेना

एटीएम पळविणाऱ्या टोळीचा तीन दिवसांनंतरही माग लागेना

googlenewsNext
ठळक मुद्दे२४ तासांत घडल्या होत्या दोन घटना कोल्हापूर पोलिसांनी पकडले होते आरोपींना

औरंगाबाद : बायपासवरील एटीएमसह २५ लाखांची रोकड पळविण्यासोबतच पडेगावच्या मिसबाह कॉलनीतील एटीएम गॅस कटरने कापून रोकड लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारांचे कोणतेही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. अशा प्रकारच्या १५हून अधिक घटना राज्यातील विविध शहरांत अलीकडच्या काळात घडल्याने विविध ठिकाणच्या पोलिसांशी संपर्क साधला जात आहे.

बीड बायपास रस्त्यावरील यशवंतनगरातील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम २५ लाख १४ हजार ७०० रुपयांसह चोरट्यांनी १२ जुलैच्या रात्री चक्क उचलून नेले. या घटनेनंतर अवघ्या काही तासांत दुसऱ्या दिवशी १३ जुलै रोजी रात्री चोरट्यांनी पडेगावच्या मिसबाह कॉलनीतील एटीएम मशीन गॅस कटरने कापून रोख पळविण्याचा प्रयत्न केला. २४ तासांत दोन घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आणि एटीएमच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. एटीएम पळविण्याची घटना कळताच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रात्रीच चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पाचोड, शहागडपर्यंत जाऊन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पाहणी केली. ढाबे, हॉटेलचालकांकडे विचारपूस केली. मात्र, त्यांना चोरट्यांचा मागमूस लागला नाही. पुंडलिकनगर पोलिसांनीही एटीएममध्ये रोकड भरणाऱ्या ईपीएस कंपनीच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली. पडेगावमधील एटीएम तोडून सुमारे चार लाखांचे नुकसान क रणे आणि एटीएममधील रोकड पळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नीलेश प्रल्हादराव शेजवळ यांनी छावणी ठाण्यात गुन्हा नोंदविला. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत.

कोल्हापूर पोलिसांनी पकडले होते आरोपींना

एटीएम पळविण्याची घटना काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथे घडली होती. यानंतर पोलिसांनी एटीएम पळविणाऱ्या टोळीला अटक केली होती. कोल्हापूर शहरातील रहिवासी असलेल्या आरोपींनीच एका वाहनामध्ये हायड्रोलिक यंत्र बसवून त्याद्वारे एटीएम मशीन उचलून नेले होते. त्या घटनेतील आरोपींचा औरंगाबादेतील घटनेशी संबंध आहे का, याबाबतची पडताळणी पोलीस करीत आहेत.

सीसीटीएनएसकडून मागविला अहवाल
एटीएम पळविण्याच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी गुन्हे शाखेने सीसीटीएनएसची मदत घेण्याचे ठरविले आहे. राज्यात आणि देशात यापूर्वी एटीएम पळविण्याच्या घटना कोठे आणि कधी घडल्या आहेत, तसेच हे गुन्हे करणाऱ्या आरोपींना पकडले होते का? याबाबतची माहिती औरंगाबाद पोलिसांनी सीसीटीएनएसकडून मागविली आहे. एटीएम पळविणारी गँग राज्यात सक्रिय झाल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली असून, पोलीस आता अलर्ट झाले आहेत.

Web Title: Do not track after three days of the ATM gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.