श्रेयाची अपेक्षा न ठेवता गुणात्मक कार्य करा: राजेंद्र दर्डा
By विजय सरवदे | Published: June 24, 2023 07:03 PM2023-06-24T19:03:36+5:302023-06-24T19:04:12+5:30
मेट्रोसिटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा शपथविधी आणि पदग्रहण सोहळ्याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, आणि विशेष अतिथी म्हणून निवृत्त न्यायमूर्ती के. यू. चांदीवाल यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
छत्रपती संभाजीनगर : कोणतेही कार्य करताना काम आमचे आणि नाव दुसऱ्याचे होत आहे, या विचाराने काहीजण नाराज होतात. त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, नेहमी वात आणि तूप जळत असते, पण लोक म्हणतात की, दिवा जळत आहे. याकडे लक्ष न देता महावीर इंटरनॅशनल मेट्रोसिटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी श्रेयाची अपेक्षा न बाळगता गुणात्मक कार्य करत राहावे, असे आवाहन ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी केले.
गुरुवारी मेट्रोसिटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा शपथविधी आणि पदग्रहण सोहळ्याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, आणि विशेष अतिथी म्हणून निवृत्त न्यायमूर्ती के. यू. चांदीवाल यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी दर्डा म्हणाले, नवीन कार्यकारिणीने चेहऱ्यावर सतत स्मितहास्य आणि शांतपणे ऐकण्याची तयारी ठेवून काम करावे. निवृत्त न्यायाधीश के. यू. चांदीवाल यांनी आज पद आहे, उद्या नसेल; पण, आपले कार्य इतिहासात नोंद होईल, या दृष्टीने पदाची प्रतिष्ठा जपावी, असे सांगून नवीन कार्यकारिणीला काही अभिनव उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. यावेळी नूतन अध्यक्ष शैलेश चांदीवाल यांनी मनोगत व्यक्त केले.
मावळते अध्यक्ष नरेश बोथरा यांनी नूतन अध्यक्ष शैलेश चांदीवाल यांच्याकडे पदाची सूत्रे सोपविली. राजकुमार बाठिया यांनी महावीर इंटरनॅशनल मेट्रोसिटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांना शपथ दिली. शेवटी उपस्थितांचे आभार सचिव अनंत जैस्वाल यांनी मानले. सुरुवातीला या शाखेच्या कार्याचा अहवाल मावळते सचिव आशिष पाटलीया यांनी, तर अनिमेश कांकरिया यांनी जमा- खर्चाचा अहवाल सादर केला. अनिल जैन यांनीही मनोगत व्यक्त केले.
नवीन कार्यकारिणी अशी
अध्यक्ष- शैलेश चांदीवाल, सचिव- अनंत जैस्वाल, कोषाध्यक्ष- कमलेश सेठिया, उपाध्यक्ष- पूनम सुराणा, ललित गांधी, महावीर रथ इन्चार्ज- तेजस कमानी, सदस्य- अनिमेश कांकरिया, आशिष पाटलीया, मनोज बोरा, अखिलेश संकलेचा, आयपीपी- नरेश बोथरा.