जलसंधारण कामाच्या ठिकाणी मत्स्य व्यवसाय करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 12:43 AM2018-07-31T00:43:46+5:302018-07-31T00:44:44+5:30
राज्य सरकारने मराठवाड्यात राबविलेली जलयुक्त शिवार योजना आणि पाणी फाऊंडेशनची वॉटर कप स्पर्धा या परस्पर पूरक योजना आहेत. वॉटर कप स्पर्धा आणि जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या जलसंधारण कामाच्या ठिकाणी पाणीसाठा झाल्यानंतर त्यात शेतकऱ्यांनी मत्स्य व्यवसाय करावा. यासाठी राज्य सरकारने एक योजना आणली असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सोमवारी येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : राज्य सरकारने मराठवाड्यात राबविलेली जलयुक्त शिवार योजना आणि पाणी फाऊंडेशनची वॉटर कप स्पर्धा या परस्पर पूरक योजना आहेत. वॉटर कप स्पर्धा आणि जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या जलसंधारण कामाच्या ठिकाणी पाणीसाठा झाल्यानंतर त्यात शेतकऱ्यांनी मत्स्य व्यवसाय करावा. यासाठी राज्य सरकारने एक योजना आणली असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सोमवारी येथे केले.
पाणी फाऊंडेशनतर्फे आयोजित वॉटर कप स्पर्धेत जिल्ह्यातील वैजापूर, फुलंब्री आणि खुलताबाद तालुक्यांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत उत्कृष्ट काम केलेल्या जलरत्नांचा गौरव समारंभ सोमवारी (दि.३०) तापडिया नाट्यमंदिर येथे आयोजित केला होता. यात विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते तीन तालुक्यांतील १६८ जलरत्नांचा गौरव करण्यात आला. यावेळी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, पाणी फाऊंडेशनचे राज्य समन्वयक नामदेव ननावरे, विभागीय समन्वयक संतोष शिनगारे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. भापकर म्हणाले, शासनाकडून पाणी फाऊंडेशनने केलेल्या कामाच्या ठिकाणी शासकीय योजना राबविण्यास प्राधान्य असणार आहे. या संस्थेचे काम शासनास पूरक असेच आहे. या माध्यमातून मराठवाड्यात पाणी चळवळ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात यश मिळाले आहे. पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी ज्या प्रमाणात चळवळ उभारली तशीच चळवळ आता निसर्ग जोपासण्यासाठी उभारावी लागणार आहे. झाडे जगविण्यासाठी सर्वांनाच प्रयत्न करावे लागणार आहेत. शेतक-यांनी भरघोस उत्पन्न देणारी पिके घ्यावीत, यातही कमी पाणी लागणा-या पिकांना प्राधान्य दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. तसेच सरकारने जलसंधारण झालेल्या ठिकाणी साचणा-या पाण्यात मत्स्य पालन योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी लागणाºया सुविधा पुरविण्यास राज्य सरकार तयार आहे. मराठवाड्यात ही योजना राबविण्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध होणार आहे. यात शेतक-यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. राज्य समन्वयक नामदेव ननावरे म्हणाले, पुढील वर्षीही या योजनेत तिन्ही तालुक्यांचा समावेश असणार आहे.
यामुळे पुढील वर्षासाठी आतापासूनच तयारी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय समन्वयक संतोष शिनगारे यांनी केले. विनोद ठोंबरे यांनी सूत्रसंचालन केले. बिभिषण भोईटे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.