तुम्ही मराठवाड्यातून आला आहात का? ‘सारथी’ संस्थेकडून संशोधक विद्यार्थ्याची छळवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 02:53 PM2019-08-27T14:53:56+5:302019-08-27T14:56:53+5:30
संशोधनासाठी मंजूर केलेले विषय व मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना तुच्छतेची वागणूक
औरंगाबाद : नव्यानेच स्थापन झालेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संशोधनासाठी मंजूर केलेले विषय व मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना तुच्छतेची वागणूक मिळाली आहे. सारथी संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी नुकत्याच मुलाखती दिल्या आहेत. त्याठिकाणी तुम्ही मराठवाड्यातून आला आहात का? असा प्रश्न विचारल्याचेही विद्यार्थ्यांनी कुलगुरूंमार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या शिष्यवृत्तीसाठी विद्यापीठात संशोधन करणाऱ्या एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनीही अर्ज केले होते. या विद्यार्थ्यांच्या २२ आॅगस्ट रोजी पुणे येथे मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतीमध्ये विद्यापीठात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांची जाणीवपूर्वक मानसिक छळवणूक करण्यात आल्याचेही निवेदनात म्हटले आहे. या मुलाखतीमध्ये इतर प्रवर्गातील प्राध्यापकांची नेमणूक करण्यात आली. त्यांनी विद्यापीठाने मंजूर केलेले संशोधन विषय नाकारले. एवढेच नव्हे तर या विषयावर संशोधन होऊ शकत नाही म्हणून अपमान केला. तुम्ही मराठवाड्यातून आला आहात का? असा हेटाळणी करणारा प्रश्न विचारल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
सर्वच विद्यार्थ्यांचे संशोधन विषय, प्रस्ताव आणि आराखडे चुकीचे, अपूर्ण असल्याने ते बदलावे लागतील, अशी अटही घालण्यात आली. काही विद्यार्थ्यांना संशोधन विषय संबंधित विषयाशी निगडित नसल्याचेही सांगण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातीलच विद्यार्थ्यांना पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन बाळगून मुद्दाम डावलल्याची शक्यताही या निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे. हे निवेदन एसईबीसी वेलफेअर असोसिएशनतर्फे देण्यात आले आहे.
१३ प्रकारची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळणार
सारथी संस्थेतर्फे एम. फिल., पीएच.डी.चे संशोधन करणाऱ्या एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या १३ शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. यासाठी महिनाभरापूर्वी आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते.