हजार मंदिरांचे छत्रपती संभाजीनगर, ४०० वर्षांचा इतिहास आहे का ठाऊक?
By प्रशांत तेलवाडकर | Published: April 21, 2023 01:40 PM2023-04-21T13:40:58+5:302023-04-21T13:43:35+5:30
अनिल मुंगीकर यांनी दोन वर्षांत घेतला सहस्त्र मंदिरांचा शोध
छत्रपती संभाजीनगर : ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगरात किती मंदिरे आहेत, असा प्रश्न कोणी तुम्हाला विचारला तर तुम्ही अनुत्तरित व्हाल. कारण, त्याची आकडेवारी आपल्यासमोर नाही किंवा ते जाणून घेण्याचा विचारही कधी मनात आला नसेल; पण आनंदाची बातमी म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक डॉ. अनिल मुंगीकर यांनी दोन वर्षांत शहरभर फिरून तब्बल १ हजार मंदिरांचा शोध घेतला. ते येथेच थांबले नाहीत तर त्यांनी त्या मंदिरांचा इतिहास व त्याचे फोटो काढून १० खंड तयार केले. आता हाच दस्तऐवज छत्रपती संभाजीनगरातील आध्यात्मिक ठेवा बनला आहे.
१० खंडांत शहरातील १ हजार मंदिरांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. प्रत्येक खंडामध्ये १०० मंदिरांचा समावेश आहे. हे एक मोठे ऐतिहासिक व धार्मिक कार्य त्यांनी केले असून, आपल्या पुढील पिढ्यांसाठी हा अनमोल वारसा असणार आहे. शहरात सुमारे ४०० वर्षांपासूनची मंदिरे आहेत; तसेच मागील वर्षी बांधलेल्यापर्यंत नवीन मंदिरांचा समावेश आहे.
या सर्वांनी बांधले एक-एक मंदिर
मुंबईतील मम्मादेवीचे मंदिर, गोव्यातील नागरिकांचे ‘पाणाजी माता’ मंदिर, सिंधी समाजाचे भगवान झुलेलाल महाराजांचे मंदिर, बंगाली समाजाने बांधलेले कालिकामातेचे मंदिर आहेच. शिवाय केरळमधून आलेल्या लोकांनी बांधलेले साताऱ्यातील अय्यप्पा मंदिर, राजपूत समाजाचे छावणीतील गुडी मंदिर, नवाबपुरातील कबीरपंथी मंदिर, नवनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि गोगा महाराज ते बालकृष्ण महाराज व निपटनिरंजन महाराज, महानुभाव आश्रम ही सर्व मंदिरे शहराचे आध्यात्मिक वैभव ठरत आहेत.
वैविध्यपूर्ण मंदिरे
छत्रपती संभाजीनगरात २०१८ ते २०१९ या काळात १ हजार मंदिरांचा शोध घेतला. त्यात ४०० वर्षे जुनी बोटावर मोजण्याइतकी मंदिरे आहेत. त्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळातील व स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची मंदिरे आहेत. जुन्या मंदिरांत कोरीव नक्षीकाम बघण्यासारखे आहे. काही जुन्या मंदिरांचा आता जीर्णोद्धार केला आहे; पण मूळ गाभारा तोच ठेवण्यात आला आहे. प्रत्येक मंदिराचा इतिहास वेगवेगळा आहे. भावसिंगपुऱ्यातील खोल बारवात असलेले महादेव-पार्वतीचे समोरासमोरील मंदिरही देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मंदिर आहे. यानिमित्ताने १ हजार देवदेवतांचे दर्शन झाले, १० खंड तयार झाले. आपल्या हातून मंदिराचा संदर्भग्रंथ तयार झाल्याचा आनंद मनात आहे.
-प्रा. डाॅ. अनिल मुंगीकर
कोणाची किती मंदिरे? हनुमान २११ मंदिरे
विविध देवींची १६८ मंदिरे, गणपतीची १३७ मंदिरे, महादेवाची ११७ मंदिरे, श्रीदत्ताची ५७ मंदिरे
विठ्ठल-रुख्मिणी ५५ मंदिरे
साईबाबा ३३ मंदिरे
श्रीकृष्ण २७ मंदिरे
बालाजी २२ मंदिरे
श्रीराम २१ मंदिरे
शनी १९ मंदिरे
अन्य देवदेवतांची ४६ मंदिरे