रेल्वेत बेवारस सापडलेल्या सामानाचे काय करतात, माहित आहे का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 07:58 PM2018-09-19T19:58:19+5:302018-09-19T19:59:23+5:30

रेल्वे डब्यात वा स्थानकावर बेवारस बॅग आढळून आल्यास प्रथम तर याच्या मालकाचा शोध घेतला जातो.

Do you know, what they do with lost luggage on the railway? |  रेल्वेत बेवारस सापडलेल्या सामानाचे काय करतात, माहित आहे का ?

 रेल्वेत बेवारस सापडलेल्या सामानाचे काय करतात, माहित आहे का ?

googlenewsNext

औरंगाबाद : रेल्वे डब्यात वा स्थानकावर बेवारस बॅग आढळून आल्यास याच्या मालकाचा शोध घेतला जातो. तो मिळून न आल्यास या वस्तूचा पंचनामा करून पार्सल विभागात याचा लिलाव करण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

विचारांच्या तंद्रीत असताना वा गर्दीमुळे उतरण्याची घाई केल्याने प्रवासी रेल्वेतच त्यांचे सामान विसरत असल्याचे अनेक घटनांवरून आढळून आले आहे. स्थानकावरही काहीवेळा प्रवासी आपले सामान कुठल्याही कारणास्तव विसरतात. रेल्वे पोलिसांना गस्तीवर असताना ही बाब निदर्शनास येते. हे सामान जप्त केले जाते.

या सामानात संबंधित प्रवाशाचा संपर्क क्रमांक, पत्ता आढळून आल्यास त्याच्याशी संपर्क साधून हे सामान त्याला परत दिले जाते; परंतु बॅग वा सुटकेसमध्ये प्रवाशाचा पुरावा आढळून न आल्यास बॅग, सुटकेसमध्ये असलेल्या मौल्यवान वस्तंूसह बॅगचा पंचनामा करून ते रेल्वेच्या विभागाकडे हस्तांतरित केले जाते. ‘लॉस आॅफ प्रॉपर्टी’ म्हणून सहा महिने याची प्रतीक्षा केल्यानंतर याचा जाहीररीत्या लिलाव केला जातो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. असाच प्रकार पार्सल विभागात घडत असल्याचे त्यांनी सांगितले. एखाद्याने दुचाकी वाहन पार्सलद्वारे पाठवले असेल; पण त्याच्याकडे कागदपत्र नसतील तर ते वाहन सोडविण्यासाठी येत नाही. ते वाहन असेच पार्सल विभागात पडून राहते. त्याचाही सहा महिन्यांनंतर लिलाव केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. यातून मिळणारे पैसे हे रेल्वे प्रशासनाकडे जमा केले जातात.

गत आठ महिन्यांत सहा-सात वस्तू सापडल्याने त्या वस्तू संबंधित प्रवाशांना परत देण्यात आलेल्या आहेत. ज्या वस्तूंचे मालक आढळून आले नाहीत, अशा वस्तू ‘लॉस आॅफ प्रॉपर्टी’ संबोधून त्यांचा लिलाव करण्यात आल्याचे रेल्वे पोलीस निरीक्षक अरविंदकुमार शर्मा यांनी सांगितले. रेल्वे प्रवासी सेनेचे संतोषकुमार सोमाणी यांनीही अनेकदा प्रवाशांचे विसरलेले सामान परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

संवादामुळे असंख्य प्रवाशांना मिळाले साहित्य
जालना आणि नगरसोल स्थानकादरम्यान औरंगाबाद हे केंद्र येते. त्यामुळे दोन्ही दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना त्यांचे सामान रेल्वे डब्यातच राहिल्याचे लक्षात आले, तर तात्काळ पुढील स्थानकावरील रेल्वे पोलिसांना कळविले जाते. त्यामुळे असंख्य प्रवाशांना जलद संवादामुळे आपले साहित्य मिळाले आहे. 

संबंधितांचा शोध घेतला जातो
बेवारस वस्तू आढळून आल्यास संबंधितांचा शोध घेतला जातो; परंतु तो न मिळाल्यास त्या वस्तूंचा पंचनामा करून रेल्वे प्रशासनाकडे जमा केली जाते. सहा महिने प्रतीक्षा करून त्याचा अधिकृतरीत्या लिलाव होतो. यातून येणारी रक्कम रेल्वे प्रशासनाकडे जमा केली जाते. 
- अरविंदकुमार शर्मा, निरीक्षक, रेल्वे पोलीस बल, औरंगाबाद

Web Title: Do you know, what they do with lost luggage on the railway?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.