हाय अलर्ट! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कुठे असेल ४५ अंशांवर तापमान माहितेय?
By संतोष हिरेमठ | Published: April 12, 2024 02:29 PM2024-04-12T14:29:31+5:302024-04-12T14:30:29+5:30
‘हीट स्ट्रेस असेसमेंट’ : उष्माघात टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणा ‘हाय अर्लट’
छत्रपती संभाजीनगर : उन्हाचा पारा दरवर्षी वाढतच असल्याचे पहायला मिळत आहे. त्यात उष्णतेच्या लाटेसाठी अतिसंवेदशील राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश झाला आहे. त्यामुळे पुढील तापमानाचा अंदाज घेऊन आरोग्य यंत्रणा ‘हाय अलर्ट’ झाली आहे. जिल्ह्यात कुठे ४४ तर कुठे ४५ अंश सेल्सिअसवर तापमानाचा पारा जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र हे देशातील उष्णतेच्या लाटेसाठी अतिसंवेदनशील राज्यांपैकी एक राज्य आहे. त्यामुळे उष्मालाटेच्या पूर्वतयारीवर भर दिला जात आहे. यादृष्टीने ‘हीट स्ट्रेस असेसमेंट’ तयार करण्यात आलेला आहे. या मूल्यांकनात मध्यम (माडरेट), उच्च (हाय) आणि अतिउच्च (व्हेरी हाय) उष्णता अनुभवणाऱ्या ठिकाणांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यात जिल्ह्यातील १९ ठिकाणी ४१ अंशावर तापमान जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
रोज ‘माईल्ट हिट’ २ ते ४ रुग्ण
घाटी रुग्णालयात ‘माईल्ट हिट’चे दररोज २ ते ४ रुग्ण येतात, अशी माहिती मेडिसीन विभागप्रमुख डाॅ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी दिली. घाटीत उष्मागाताच्या रुग्णांसाठी १० बेड सज्ज ठेवण्यात आले आहेत.
कुठे किती तापमानाची शक्यता?
ठिकाण - कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
- उस्मानपुरा- ४०.२
- चिकलठाणा- ४०.१
- हर्सुल- ४१.६
- कांचनवाडी- ४१.८
- करमाड- ४३.२
- देवगाव रंगारी- ४२.८
- सिल्लोड-४१.५
- नाचनवेल- ४१.२
- बनोटी-४२.३
- सुलतानपूर- ४२.६
- वेरुळ- ४२.९
- सोयगाव-४४.८
- बोरसर (वैजापूर) - ४५.५
आवश्यक ती खबरदारी
उष्मालाटेच्या अनुषंगाने आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळी बाहेर पडणे टाळावे. काही लक्षणे वाटल्यास वेळीच वैद्यकीय सल्ला घ्यावा.
- डाॅ. अभय धानोरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी