सेक्स करायला आवडतो का?; चालकाचा प्रश्न ऐकताच अल्पवयीन मुलीने रिक्षातून उडी मारली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 11:54 AM2022-11-16T11:54:16+5:302022-11-16T11:57:31+5:30

सिल्लेखाना परिसरातील घटना : दुसऱ्या गाडीखाली येण्यापासून बालंबाल बचावली मुलगी, आरोपीला बेड्या

Do you like to have sex? As soon as the driver asked, the minor girl jumped out of the rickshaw | सेक्स करायला आवडतो का?; चालकाचा प्रश्न ऐकताच अल्पवयीन मुलीने रिक्षातून उडी मारली

सेक्स करायला आवडतो का?; चालकाचा प्रश्न ऐकताच अल्पवयीन मुलीने रिक्षातून उडी मारली

googlenewsNext

औरंगाबाद : तुला सेक्स करायला आवडतो का? असा अश्लाघ्य प्रश्न विचारून चालकाने रिक्षा भरधाव पळविल्यामुळे घाबरलेल्या अल्पवयीन मुलीने त्या रिक्षातून उडी घेतली. दैव बलवत्तर म्हणून ती रिक्षामागून येणाऱ्या कारच्या खाली जाण्यापासून थोडक्यात बचावली, परंतु या धाडसात तिच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून तिच्यावर एमजीएम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सिल्लेखाना ते तारभवन रस्त्यावरील संकल्प क्लासेससमोर रविवारी (दि. १३) दुपारी १२.२५ वाजता ही खळबळजनक घटना घडली. या प्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंदवित पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.

सय्यद अकबर सय्यद हमीद (३९, रा. प्लॉट नं. १५६, कैसरबाग, पडेगाव) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी कसून शोध घेत त्याला अटक केली.
पोलिसांनी सांगितले की, शहरातील एका महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिकणारी ही मुलगी शिकवणी संपल्यानंतर गोपाल टी येथून रिक्षातून एकटीच खोकडपुऱ्यात घरी निघाली होती. या प्रवासात रिक्षाचालकाने प्रथम तिला कौटुंबिक माहिती विचारली. तुला सोबत फिरायला आवडेल का? असेही विचारले. रिक्षा सिल्लेखाना चौकातून उजवीकडे वळवून खोकडपुऱ्याच्या दिशेने निघाली तेव्हा त्याने तिला सेक्स करायला आवडेल का? अशी विचारणा करीत रिक्षाचा वेग अचानक वाढविला. भेदरलेल्या मुलीने थेट रस्त्यावर उडी घेतली.

ती उस्मानपुरा भागातील वेगवेगळ्या तीन क्लासेसमध्ये नीटची तयारी करते आहे. तिला दररोज सकाळी वडील नेऊन सोडतात. क्लास संपल्यानंतर रिक्षाने ती घरी जाते. रविवारी क्लास संपल्यानंतर ती गोपाल टी येथून रिक्षात (एमएच २० ईएफ १५६२) बसली. पाच दिवसांपूर्वीही ती त्याच रिक्षातून घरी गेली होती. त्यामुळे चालक तोंडओळखीचा होता.

संकल्प क्लासेससमोर भरधाव रिक्षातून तिने उडी घेतली. रस्त्याच्या मधोमध ती पडली. त्याचवेळी पाठीमागून वेगात कार आली. मात्र, त्या चालकाने ब्रेक दाबल्यामुळे ती बालंबाल बचावली. ही सर्व घटना येथील सीसीटीव्हीत कैद झाली. परिसरातील नागरिकांनी धाव घेत तिला उचलले. तिच्या वडिलांच्या ओळखीच्या व्यक्तीने घरी फोन करून घटना सांगितली. तेव्हा तिचा चुलता, भाऊ यांनी घटनास्थळी धाव घेत तिला एमजीएम रुग्णालयात दाखल केले. मुलीच्या जवाबावरून गुन्हा नोंदवून अधिक तपासासाठी उपनिरीक्षक अमोल सोनवणे यांच्याकडे सोपवला आहे.

अशी घटना आली उघडकीस
रविवारी दुपारी घडलेल्या घटनेची एमएलसी एमजीएम रुग्णालयातून क्रांती चौक पोलिसांना सोमवारी (दि.१४) मिळाली. त्यानुसार एक कर्मचारी मुलीच्या जबाबासाठी रुग्णालयात गेला. घटनेचे गांभीर्य ओळखून त्याने निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांना माहिती दिली. डॉ. दराडे यांनी रुग्णालयात धाव घेतली. तसेच विशेष पथकाचे उपनिरीक्षक विकास खटके यांना रिक्षासह चालकाचा शोध घेण्याचा आदेश दिला. पोलिसांनी विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर १० रिक्षांची तपासणी करीत रिक्षा ओळखला. यासाठी डॉ. दराडे हे आरटीओ ऑफिसमध्ये बसून होते, तर वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक महादेव गायकवाड यांनीही मदत केली.

रिक्षा एकाची, चालवतो दुसराच
रिक्षाच्या नंबरवरून क्रांती चौक पोलीस मालकापर्यंत पोहोचले. मालकाने रिक्षा त्याच्या जावयाला चालविण्यास दिल्याचे सांगितले. त्या जावयाने घुगे नावाच्या व्यक्तीला रिक्षा सोपवली होती. घुगेने बशीर नावाच्या व्यक्तीला रिक्षा दिली. त्या बशीरने त्याच्या जावयाच्या माध्यमातून आरोपी सय्यद अकबर यास ३०० रुपये दिवस अशी रिक्षा चालविण्यास दिल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले.

आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली
आरोपी पडेगाव भागात राहत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी आरोपीला सायंकाळी घरातून ताब्यात घेतले. ठाण्यात आणल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी हा विवाहित आहे. ही कामगिरी निरीक्षक डॉ. दराडे, उपनिरीक्षक खटके, हवालदार मुदीराज, इरफान खान, संतोष सूर्यवंशी, भावलाल चव्हाण, हनुमंत चाळणेवाड, शेख मुश्ताक, सज्जन जोनवाल यांच्या पथकाने केली.

काळजीपूर्वक हाताळले प्रकरण
क्रांती चौक पोलिसांना प्रकरण अतिशय काळजीपूर्वक हाताळले. आरोपीच्या अटकेसाठी पथके तैनात केली. तसेच सीसीटीव्हीसह, आरटीओ, वाहतूक पोलिसांचीही मदत घेतली.

सव्वा वर्षांपूर्वीही अशीच घटना
मागील वर्षी २८ ऑगस्ट २०२१ रोजी मोंढा नाका उड्डाणपुलापासून येथून क्लासेसला जाण्यासाठी १६ वर्षांची मुलगी रिक्षात बसली होती. तेव्हा रिक्षाचालक आनंद पडूळकर याने तुला शहर फिरवून आणतो, असे सांगत आक्षेपार्ह वर्तन सुरू केले. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने भरधाव रिक्षातून उडी घेतली. त्यातही शहर पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली होती.

Web Title: Do you like to have sex? As soon as the driver asked, the minor girl jumped out of the rickshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.