रोज ‘प्रभात फेरी’ करणाऱ्या महापौरांना खासदार व्हायचेय का ?; चंद्रकांत खैरे यांच्या महापौरांना कानपिचक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 11:35 AM2018-11-28T11:35:28+5:302018-11-28T11:43:04+5:30
महापौरांना आता खासदार, आमदार व्हायचे आहे काय? असा सवाल करीत खा. खैरे यांनी त्यांच्या जनसंपर्क मोहिमेवर तोंडसुख घेतले.
औरंगाबाद : महापौर नंदकुमार घोडेले यांनी दररोज सकाळी जनतेच्या दारी जाऊन भेटी-गाठीचे सुरू केलेले सत्र अखेर मंगळवारी खा. चंद्रकांत खैरे यांच्या डोळ्यांत आले. महापौरांना आता खासदार, आमदार व्हायचे आहे काय? असा सवाल करीत खा. खैरे यांनी त्यांच्या जनसंपर्क मोहिमेवर तोंडसुख घेतले. शहरातील विकासकामे रखडली आहेत, त्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे खासदारांनी महापौरांवर पत्रकारांशी बोलताना टीकास्त्र सोडले.
दिशा समिती, रस्ते सुरक्षा समिती आणि ग्रामीण विकासाशी निगडित समित्यांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पंतप्रधान आवास योजनेत ग्रामीण भागांत सुरू असलेल्या कामाच्या तुलनेत महापालिकेच्या हद्दीत गती मिळत नसल्यामुळे खा. खैरे यांनी महापौर घोडेले यांना ग्रामीणविकासच्या बैठकीत विकासकामांकडे लक्ष द्या, असे बोलून चिमटा काढला. महापौर घोडेले हे गोवर आणि रुबेला लसीकरण मोहिमेच्या उद्घाटन कार्यक्रमात बराच वेळ अडकले. त्यामुळेही खा. खैरे संतापले. या मोहिमेला सुरुवात केल्यानंतर महापौरांनी तिथे अडकून राहण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर रखडलेल्या मनपांतर्गत असलेल्या सगळ्याच कामांचा धांडोळा खा. खैरे यांनी घेतला.
मध्य मतदारसंघातून हवी उमेदवारी
पत्रकारांनी खा. खैरे यांना प्रश्न केला की, महापौर घोडेले यांना मध्य मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. त्यावर खा. खैरे म्हणाले, ते मी ठरवील ना, माझ्या हातात आहे, त्यांना कुठून उभे करायचे आहे ते. काँग्रेसचे केंद्रात सरकार असताना भूमिगत गटार योजना, समांतर जलवाहिनी योजनांसाठी निधी मिळविला. त्या योजना पूर्ण करण्याकडे महापौरांनी लक्ष दिले पाहिजे.
२७ जानेवारीपासून आचारसंहिता
२७ जानेवारी २०१९ पासून लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे. आजपासून दोन महिन्यांचा कार्यकाळ राहिला आहे. त्यामुळे केंद्र शासनाने मनपा हद्दीत दिलेल्या योजनांची कामे गतीने करून घेतली पाहिजेत. आचारसंहितेत प्रशासनातील अधिकारी पदाधिकाऱ्यांना मोजतदेखील नाहीत. पंतप्रधान आवास योजनेसह शहरातील समांतर जलवाहिनी योजना, भूमिगत गटार योजना, रस्त्यांची कामे रखडली आहेत. त्यांना गती देण्याची आवश्यकता असल्याचे खैरे म्हणाले.