तुम्ही काम करा; आमचे सहकार्यच राहील; नवनियुक्त आयुक्तांना पदाधिकाऱ्यांचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 11:17 AM2018-05-17T11:17:56+5:302018-05-17T11:22:04+5:30
महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी बुधवारी सकाळी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.
औरंगाबाद : महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी बुधवारी सकाळी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी नवनिर्वाचित आयुक्तांना पदाधिकाऱ्यांनी ‘तुम्ही काम करा, आमचे शंभर टक्केसहकार्य राहील’. कोणताही निर्णय घेताना सर्वांना विश्वासात घ्या. मागील काही दिवसांपासून अनेक कामे रेंगाळली आहेत. या कामांना गती देण्याची सूचनाही करण्यात आली.
मनपा आयुक्त आणि पदाधिकाऱ्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. महापौरांनी तब्बल ५८ विकासकामांची यादीच डॉ. निपुण यांच्या हातात दिली. आयुक्तांनी प्राधान्याने सहा विषय घेऊन विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. घनकचरा व्यवस्थापनात स्वत: ‘निपुण’असलेल्या आयुक्तांनी स्वच्छतेच्या कामासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांची मदत घेण्यात येणार असल्याचे नमूद केले. यावेळी उपमहापौर विजय औताडे, सभागृह नेते विकास जैन, स्थायी समितीचे माजी सभापती गजानन बारवाल, सेनेचे गटनेते मकरंद कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
आयुक्तांवर संपूर्ण विश्वास
मनपा आयुक्तांनी सकाळी ८ वाजेपासून कामाला सुरुवात केली. त्यामुळे त्यांची जिद्द, तळमळ लक्षात येते. शहरा कचराकोंडी, नालेसफाई, मालमत्तांचे सर्वेक्षण, पाणी प्रश्न, आकृतिबंध आणि रिक्त जागा भरणे, स्मार्ट सिटी, समांतर योजना आदी विविध विषय प्राधान्याने सोडवावेत, अशी सूचना आयुक्तांना केली आहे. भूमिगत गटार योजना पूर्ण करणे, कचºयाचा केंद्रीय प्रकल्प उभारणे, स्मार्ट सिटीच्या कामांना गती देण्याबद्दलही चर्चा करण्यात आली आहे. यात आपण लक्ष घालून काम करण्याची इच्छा आयुक्तांनी व्यक्त केल्याचे घोडेले यांनी सांगितले.
कॅलेंडर वर्ष पूर्ण करणार का?
काही अपवाद वगळता महापालिकेत एकाही आयुक्ताने एक कॅलेंडर वर्ष पूर्ण केलेले नाही. कधी पदाधिकारी विरुद्ध आयुक्त असा सामना रंगतो. तर कधी आयुक्तांवर अविश्वास ठराव आणण्यात येतो. १२ महिने किंवा जास्तीत जास्त १४ महिने या पदावर अनेक आयुक्तांनी काम केले आहे. राज्य शासनाने खास निपुण विनायक यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे ते आपला कार्यकाळ कसा पूर्ण करतील याकडे पालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.