रुग्ण तपासणीची वेळ साडेआठची डॉक्टर आले सव्वा अकराला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:06 AM2021-06-16T04:06:21+5:302021-06-16T04:06:21+5:30
आळंद : अत्यावश्यक सेवा असलेल्या आरोग्य विभागाची लक्तरे वेशीवर टांगण्याचा प्रकार आरोग्य केंद्रांमध्ये वारंवार घडताना दिसत आहे. फुलंब्री तालुक्यातील ...
आळंद : अत्यावश्यक सेवा असलेल्या आरोग्य विभागाची लक्तरे वेशीवर टांगण्याचा प्रकार आरोग्य केंद्रांमध्ये वारंवार घडताना दिसत आहे. फुलंब्री तालुक्यातील आळंद येथील प्रा.आ. केंद्रात सोमवारी बाह्यरुग्ण विभागात रुग्ण तपासणीची वेळ साडेआठची असताना डॉक्टर सव्वा अकरा वाजता म्हणजे तब्बल पावणेदोन तासांनी हजर झाले. यामुळे सर्व रुग्ण ताटकळले होते. डॉक्टरांच्या या मनमानीविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
औरंगाबाद-जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील आळंद हे मोठे बाजारपेठेचे गाव आहे. या ठिकाणी सर्व सोयी-सुविधायुक्त आरोग्य केंद्र आहे. या केंद्रांतर्गत आसपासच्या जवळपास १६ गावांचा समावेश असल्याने येथे उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर रुग्ण येतात. येथील आरोग्य केंद्रासाठी कायमस्वरूपी दोन व प्रशिक्षणार्थी एक असे तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती आहे.
सोमवारी सकाळी आरोग्य केंद्रात तपासणी व उपचारासाठी २० ते २५ रुग्ण आले हाेते. यात चार महिला या प्रसूतीपूर्व तपासणीसाठी आल्या होत्या. सकाळी साडेआठ वाजता ओपीडीची वेळ आहे. मात्र तोपर्यंत केंद्रात केवळ चार कर्मचारी आले होते. तसेच रक्त तपासणीसाठी प्रयोगशाळा तंत्रज्ञही हजर नव्हता. डॉक्टर मात्र न आल्याने रुग्ण तपासणीसाठी ताटकळून बसले होते. यानंतर पावणेदोन तासांनी म्हणजे सव्वा अकरा वाजता डॉक्टरांचे आगमन झाले. मात्र, तोपर्यंत काही रुग्ण हे खासगी दवाखान्यात गेले होते. डाॅक्टर कर्मचाऱ्यांच्या या हलगर्जीमुळे रुग्णांनी संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे या आरोग्य केंद्राच्या कारभाराकडे रुग्णकल्याण समितीचेही दुर्लक्ष होत असल्याने कर्मचाऱ्यांचे फावत आहे. याबाबत तालुका आरोग्य आधिकारी डॉ. प्रसन्न भाले यांच्याशी संपर्क साधला असता, मी मिटिंगमध्ये आहे. असे म्हणत बोलणे टाळले.
चौकट
मुख्यालयी राहत नाहीत डॉक्टर
आळंद येथे डॉक्टरांना राहण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून निवासस्थाने बांधली आहेत. मात्र, या निवासस्थानात डॉक्टर राहत नसून ते औरंगाबादहून ये-जा करतात. यामुळे रात्री-अपरात्री रुग्णांना तपासण्यासाठी डाॅक्टर उपलब्ध नसतात. त्यामुळे नाइलाजाने अनेक रुग्णांना खासगी दवाखान्याचा रस्ता धरावा लागतो.
कोट
मी रक्त तपासणी करण्यासाठी सकाळी ९ वाजेपासून आरोग्य केंद्रात आलो होतो. येथील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आल्यावर रक्त तपासणी होईल, असे सांगितले. साडेअकरा वाजेपर्यंत थांबूनही कर्मचारी न आल्याने मला रक्त तपासणी न करताच परत जावे लागले.
- सईद निजाम बेग,
आळंद
कोट
आळंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांची लवकरच मिटिंग घेऊन त्यांना वेळेवर हजर राहण्यासाठी सूचना करण्यात येईल. त्यानंतरही असा प्रकार परत घडल्यास उशिरा येणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांची वरिष्ठांकडे तक्रार करण्यात येईल.
- जितेंद्र जैस्वाल,
जि.प. सदस्य तथा
रुग्णकल्याण समिती अध्यक्ष
फोटो ओळ : आळंद येथील आरोग्य केंद्रात तपासणी करण्यासाठी ताटकळत बसलेले रुग्ण.
140621\20210614_111511_1.jpg
आळंद येथील आरोग्य केंद्रात तपासणी करण्यासाठी ताटकळत बसलेले रुग्ण.