चोख सुरक्षेतील एमजीएम वसतिगृहात डॉक्टर विद्यार्थीनीचा गळा दाबून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 06:59 PM2018-12-12T18:59:06+5:302018-12-12T18:59:31+5:30
तीन दिवसांपासून आकांक्षा वसतिगृहात एकटीच होती.
औरंगाबाद: महात्मा गांधी मिशन (एमजीएम) कॅम्पसमधील मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या २२ वर्षीय डॉक्टर विद्यार्थिनीचा तिच्या रूममध्ये घुसून गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आला. यामुळे खळबळ उडाली असून या घटनेचा तपास सिडको पोलिसांनी सुरू केला.
डॉ. आकांक्षा अनिल देशमुख (रा. झेंडाचौक, पाटील गल्ली, माजलगाव, बीड) असे खून झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. आकांक्षा एमजीएमच्या फिजिओथेरपी कॉलेजमध्ये मास्टर्स आॅफ फिजिओथेरपी या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिकत होती.
सिडको पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आकांक्षा ही एमजीएममधील मुलींच्या वसतिगृहातील चौथ्या मजल्यावरील रूम नंबर ३३४ मध्ये दोन विद्यार्थिनीसोबत राहत होती. तिच्या रूमपार्टनर तंत्रनिकेतन आणि इंजिनिअरींच्या विद्यार्थिनी असून त्यांची परीक्षा नुकतीच झाल्याने त्या गावी गेल्या होत्या. यामुळे तीन दिवसांपासून आकांक्षा वसतिगृहात एकटीच होती. मंगळवारी (दि.११) आकांक्षाला दिवसभर कोणीही तिला पाहिले नाही.
यामुळे रात्रपाळीच्या वसतिगृह सहप्रमुख ( वॉर्डन) एका मुलीला सोबत घेऊन आकांक्षाच्या खोलीत गेल्या. त्यावेळी त्यांना आकांक्षा खोलीत निपचित पडलेली दिसली. त्यांनी या घटनेची माहिती लगेच आकांक्षाचा चुलतभाऊ, एमजीएम नर्सिंगमधील प्राध्यापक डॉ. राहुल देशमुख आणि वसतिगृहप्रमुख प्रेरणा दळवी यांना कळविली.
यानंतर आकांक्षाला एमजीएम अपघात विभागात दाखल केले. अपघात विभागातील डॉक्टरांनी रात्री साडेदहा वाजता आकांक्षाला तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती माजलगाव येथे राहणाऱ्या तिच्या आई-वडिलांना आणि सिडको पोलिसांना कळविण्यात आली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी, उपनिरीक्षक भरत पाचोळे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
खूनाचा गुन्हा नोंदवून तपास करणार
याविषयी बोलताना पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे म्हणाले की, डॉक्टरांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवालानुसार आकांक्षाचा गळा दाबल्यानेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.यामुळे हा खूनाचाच प्रकार असल्याने याप्रकरणी सरकारपक्षातर्फे खुनाचा गुन्हा नोंदवून तपास करण्यात येत आहे. - डॉ.राहुल खाडे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ २.