डाॅक्टर, १० दिवस झाले तरी खोकला जाईना; तापमानात चढ-उताराने बालकांना आजारांचा विळखा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 07:37 PM2023-01-23T19:37:27+5:302023-01-23T19:37:51+5:30
विशेषत: रोगप्रतिकारशक्ती कमी असलेली लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला यांना या वातावरणाचा त्रास जाणवत आहे.
औरंगाबाद : सकाळी आणि रात्री थंडी, दुपारी ऊन... कधी तापमान वाढते, तर कधी घसरते, असा अनुभव गेल्या काही दिवसांपासून येत आहे. वातावरणातील अशा बदलाने बालकांना सर्दी, खोकल्याचा विळखा पडत आहे. बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या १० पैकी ८ बालके सर्दी, खोकल्याची असल्याचे निरीक्षण बालरोगतज्ज्ञांनी नोंदविले आहे. यातही सर्दी, खोकला आला की साधारण चार ते पाच दिवसांत कमी होतो, असाच आजवरचा अनुभव आहे. मात्र, १० दिवस झाले, १५ दिवस झाले तरी चिमुकल्याचा खोकला काही जात नाही, अशा तक्रारी पालकांकडून वाढत आहेत.
बदलत्या वातावरणामुळे तापमान कमी-अधिक होत आहे. दुपारी ऊन, तर सकाळी आणि सायंकाळी गारवा जाणवतो. अशा परिस्थितीत आजार बळावत आहेत. विशेषत: रोगप्रतिकारशक्ती कमी असलेली लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला यांना या वातावरणाचा त्रास जाणवत आहे. शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांत ओपीडीमध्ये सर्दी, खोकला आणि तापाच्या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. बालकांमध्ये न्यूमोनियाची कोणतीही लक्षणे दिसल्यास गांभीर्याने घेतले पाहिजे. बालकाचे आजारपण अंगावर काढता कामा नये, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.
सर्वसाधारण खोकला चार दिवसांत बरा
सर्वसाधारण सर्दी, खोकला हा तीन ते चार दिवसांत बरा होतो. जास्त दिवस खोकला राहत असेल तर त्याची वेगवेगळी कारणे असतात. न्यूमोनिया, ॲलर्जी, बालदमा अशा परिस्थितीत अधिक दिवस खोकला राहतो.
- डाॅ. प्रभा खैरे, बालरोग विभागप्रमुख, घाटी
सर्दी, खोकल्याचे अधिक बालरुग्ण
सध्या सर्दी, खोकल्याने त्रस्त बालरुग्णांची संख्या अधिक आहे. बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या दहापैकी आठ बालके ही सर्दी, खोकल्याची आहेत. ताप, सर्दी चार ते पाच दिवसांत बरी होते. परंतु, खोकला जात नसल्याचे सध्या दिसत आहे.
- डाॅ. अभय जैन, बालरोगतज्ज्ञ