डाॅक्टर साहेब, खूप टेन्शन आले, काय करू? जाणून घ्या एक्स्पर्ट ओपिनियन
By संतोष हिरेमठ | Published: August 24, 2023 07:35 PM2023-08-24T19:35:30+5:302023-08-24T19:36:27+5:30
टेन्शन येणे नैसर्गिक आहे. पण ते पकडून ठेवणे नुकसानकारक आहे.
छत्रपती संभाजीनगर : हल्ली अगदी शालेय मुलेदेखील टेन्शन आल्याचे म्हणताना दिसतात. दैनंदिन जीवनात अनेक कारणांनी टेन्शन म्हणजेच ताणतणावाला सामारे जावे लागते. थोडीशी काळजी तर टेन्शन सहजपणे दूर होऊ शकते. याबाबत अनेक प्रश्नांवर एक्स्पर्ट ओपिनियन दिली आहे घाटी रुग्णालयातील मनोविकृतीशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डाॅ. प्रदीप देशमुख यांनी.
मोबाइल वापराचे मानसिक आरोग्यावर परिणाम होतो का?
मोबाइलचा वापर योग्य प्रमाणात केला पाहिजे. मोबाइलच्या अतिवापरामुळे निद्रानाश, एकाग्रता कमी होणे, चिडचिडेपणा, सहनशीलता कमी होणे, एकटेपणा, थकवा, डोकेदुखीसारख्या समस्या उद्भवतात.
टेन्शन येते म्हणजे काय होते?
टेन्शन येणे नैसर्गिक आहे. पण ते पकडून ठेवणे नुकसानकारक आहे. टेन्शन येते म्हणजे एखाद्या विशिष्ट विचारांची डोक्यात (मेंदूमध्ये) गर्दी होते किंवा विचारांचा गोंधळ होतो. भविष्यात आपल्यासोबत काहीतरी वाईट घडेल किंवा आपल्याला पेलवणार नाही, असे काही घडेल, याची चिंता वाटत राहते. डोके जड पडणे किंवा सुन्न होणे, चिडचिडेपणा, निद्रानाश, कामात लक्ष न लागणे, उत्साह कमी होणे, आम्लपित्ताचा त्रास, भूक मंदावणे आदी लक्षणे दिसून येतात.
टेन्शन कसे दूर करायचे?
मला टेन्शन आलेच नाही पाहिजे, हा अट्टाहास सोडा. थोडेफार टेन्शन भविष्यात येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी लागणाऱ्या पूर्वतयारीसाठी, व्यवस्थापनासाठी गरजेचे आहे. तणाव कमी करण्यासाठी मन स्थिर असणे आवश्यक आहे. मन स्थिर करण्यासाठी व्यायाम, शारीरिक (मैदानी) खेळ, ध्यानधारणा, संवाद, वाचन, छंद जोपासणे गरजेचे आहे.
टेन्शन आल्यास काय करू नये?
टेन्शन दूर होण्यासाठी धूम्रपान, मद्यपान किंवा इतर ड्रग्सचे सेवन, व्हिडीओ गेम खेळणे, मोबाइलचा अतिवापर, चहा, कॉफीचे अतिसेवन टाळावे. या सर्व कृती म्हणजे तात्पुरते पलायन. परंतु त्यातून दीर्घकालीन गंभीर परिणाम होतात. त्यामुळे त्यापासून दूरच राहिलेले बरे.