'डॉक्टर, हा साप चावला'; पुतण्या अन् सापाला घेऊन काकाची उपचारासाठी भटकंती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 07:02 PM2024-01-02T19:02:56+5:302024-01-02T19:03:13+5:30
सर्पदंशावरील उपचारासाठी पुतण्या अन् सापाला घेऊन काकाची अजिंठा ते छत्रपती संभाजीनगर भटकंती
सिल्लोड: सापाने अजिंठा येथील आठवी कक्षेत असलेल्या एका १४ वर्षीय शाळकरी मुलाच्या पायाच्या अंगठ्याला चावा घेतला. मुलाच्या काकाने चक्क तो सर्प पकडून मुलासह थेट रुग्णालय गाठले. त्यानंतर मुलगा डॉक्टरांना तो साप विषारी आहे की बिन विषारी हे दाखवण्यासाठी तो चक्क उशाला घेऊन झोपला.बघा साहेब, या सापाने मला चावा घेतला आता करा उपचार असे सांगताच डॉक्टरही काही काळ चकित झाले. ही घटना अजिंठा गावातील खारी बारव येथे सोमवारी सायंकाळी ५ वाजता घडली.
सिल्लोड तालुक्यातील जगप्रसिद्ध अजिंठा गावात निजाम कालीन बारवची दुरवस्था झाली असून ग्रामस्थ त्यात कचरा टाकत आहेत. सोमवारी सायंकाळी ५ वाजता बारवमधून निघालेल्या एका सर्पाने १४ वर्षीय शेख अमान शेख रशीद याला दंश केला.मुलाचे काका शेख चांद शेख जलील यांनी लागलीच तो साप पकडला. मुलाला व त्या सापाला घेऊन ते थेट अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयात आले. तेव्हा हा साप मुलाला चावला आहे, डॉक्टर करा उपचार असे काका म्हणताच रुग्णालयातील सर्वजण घाबरून गेले. डॉक्टरांनी साप एका बाटलीत टाकण्यास सांगितले. दरम्यान, मुळावर प्राथमिक उपचार करून त्यास सिल्लोड येथे रवाना केले. येथेही सर्प विषारी आहे की बिन विषारी हे न समजल्याने मुलास छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. येथे तो सर्प बिन विषारी असल्याचे डॉक्टरांना समजले. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला...
तो सर्प बिनविषारी
सदर चावा घेणाऱ्या सर्पाचे नाव पानदिवट असे असून तो बिनविषारी आहे. तो पाण्यात राहतो.
-डॉ. संतोष पाटील, पर्यावरण मित्र.