घाटीच्या ओपीडीत आता २ वाजेपर्यंत डॉक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 11:45 PM2019-01-31T23:45:02+5:302019-01-31T23:45:53+5:30
घाटी रुग्णालयात रुग्णांच्या सुविधेसाठी आणि अपघात विभागातील गर्दी कमी करण्यासाठी बाह्यरुग्ण विभागात आता २ वाजेपर्यंत डॉक्टर उपलब्ध राहणार आहेत.
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात रुग्णांच्या सुविधेसाठी आणि अपघात विभागातील गर्दी कमी करण्यासाठी बाह्यरुग्ण विभागात आता २ वाजेपर्यंत डॉक्टर उपलब्ध राहणार आहेत.
घाटीतील ओपीडीत सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत रुग्णांची आतापर्यंत नोंदणी करता येत होती. त्यानंतर येणारे रुग्ण थेट अपघात विभागात जात असत. त्यातून अपघात विभागात गंभीर रुग्णांबरोबर साधारण आजारांच्या रुग्णांचीही अधिक गर्दी होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे आता ओपीडीत दुपारी १ वाजेपर्यंत रुग्णांची नोंदणी करता येणार आहे, तर याठिकाणी २ वाजेपर्यंत डॉक्टर कार्यरत राहणार आहेत. त्यामुळे १ वाजता नोंदणी झालेल्या रुग्णांची यापुढे २ वाजेपर्यंत तपासणी शक्य होणार आहे.
याबरोबरच आता अपघात विभागाऐवजी ओपीडीतच रुग्ण भरती विभाग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे अपघात विभागातील गर्दीवर नियंत्रण येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रभारी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे म्हणाले, अपघात विभागातील गर्दी कमी करण्यासाठी हा बदल क रण्यात आला आहे.
‘वर्ग घेण्यास सांगू नका’
ओपीडीची वेळ वाढविण्यात आली आहे; परंतु यामुळे वैद्यकीय शिक्षणाऐवजी सर्व शक्ती रुग्णांच्या उपचारावर खर्च होत आहे. त्यामुळे वर्ग घेण्यास सांगू नका, असे काही डॉक्टरांनी घाटी प्रशासनाला म्हटले. त्यामुळे घाटी प्रशासनाची कोंडी झाली आहे.