मृत्यूनंतर तुम्हीही घडवू शकतात डाॅक्टर, देहदान वैद्यकीय शिक्षणासाठी ठरते अमुल्य
By संतोष हिरेमठ | Published: July 29, 2023 08:50 PM2023-07-29T20:50:57+5:302023-07-29T20:52:19+5:30
वैद्यकीय शिक्षणासाठी १० विद्यार्थ्यांमागे हवा एक मृतदेह, प्रत्यक्षात २० विद्यार्थ्यांमागे एक मृतदेह
छत्रपती संभाजीनगर :मृत्यूनंतरही एक व्यक्ती अनेक डाॅक्टर घडवू शकतो. हो, हे खरे आहे. तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे? मात्र, हे शक्य होत आहे देहदानाच्या माध्यमातून. वैद्यकीय विद्यार्थ्यांना शरीररचनाशास्त्र शिकण्यासाठी हे मृतदेह महत्त्वाचे ठरतात. निकषानुसार १० विद्यार्थ्यांमागे एक मृतदेह असावा. परंतु, आजघडीला २० विद्यार्थ्यांमागे एक मृतदेह असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे देहदान वाढण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.
गेल्या काही वर्षांत होणाऱ्या जनजागृतीमुळे देहदानाचे प्रमाण वाढत आहे. परंतु, अद्यापही हे प्रमाण विद्यार्थी संख्येच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत २० विद्यार्थ्यांमागे एक मृतदेह मिळत आहे. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांची अवस्था यापेक्षा चिंताजनक असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांकडून खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना मृतदेह घेण्याचीही वेळ ओढावत आहे.
कसे करता येईल देहदान?
देहदान करण्यासाठी इच्छापत्र म्हणजे अर्ज घाटीतील शरीररचनाशास्त्र विभागात उपलब्ध आहे. या अर्जावर दोन नातेवाइकांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक असतात. अर्ज भरलेला नसतानाही मृत्यूनंतर एखाद्या व्यक्तीचे देहदान नातेवाईक करू शकतात. देहदानानंतर रासायनिक प्रक्रिया करून मृतदेह वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले जातात.
घाटी रुग्णालयातील देहदानाची स्थिती
वर्ष-----देहदान
२०१९-१७
२०२०-१०
२०२१-१२
२०२२-२०
२०२३-७
घाटीत वर्षाला किती विद्यार्थ्यांना शरीररचनेचे धडे?
- ‘एमबीबीएस’चे २०० विद्यार्थी.
- ‘बीडीएस’चे ६५ विद्यार्थी.
- नर्सिंगचे ५० विद्यार्थी.
गेल्या ५ वर्षांत किती जणांनी घडविले मृत्यूनंतर डाॅक्टर?
घाटी रुग्णालयातील शरीररचनाशास्त्र विभागात गेल्या ५ वर्षांत एकूण ६६ देहदान झाले. यात ४० पुरुष आणि २६ महिलांचे देहदान झाले. यावर्षी आतापर्यंत केवळ ७ देहदान झाले आहे. या सगळ्यांच्या माध्यमातून अनेक डाॅक्टर घडू शकले.
देहदानासाठी पुढे यावे
वैद्यकीय शिक्षणासाठी देहदान महत्त्वाचे आहे. याद्वारे शरीररचना शिकविण्यात येते. त्यामुळे देहदानाचे प्रमाण वाढले पाहिजे. जास्तीत जास्त लोकांनी त्यासाठी पुढे यावे.
- डाॅ. शिवाजी सुक्रे, शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख, घाटी तथा अधिष्ठाता, परभणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय