डाॅक्टरांची किमया भारी ! 'तो' गंवडी पुन्हा उभा राहिला, वर्षभरात १८०० रुग्णांचे रोखले अपंगत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2021 05:33 PM2021-12-03T17:33:11+5:302021-12-03T17:34:19+5:30
जन्मजात पाय वाकडे असलेल्या ९० टक्के रुग्णांवर यशस्वी उपचार
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : घरावरून अचानक पडल्याने जालना जिल्ह्यातील एका गवंड्याच्या मणक्याला मार लागला आणि दोन्ही पाय लुळे पडले. रुग्णाची परिस्थिती पाहून जालन्याहून थेट त्याला घाटीत पाठविण्यात आले. मणक्याच्या नसा दबल्याने पायांना कायमस्वरुपी अपंगत्व येण्याची स्थिती होती. मात्र घाटीतील अस्थिव्यंगोपचार विभागातील डाॅक्टरांनी हे आव्हान पेलले आणि तब्बल २० दिवसांच्या उपचारानंतर गवंडी पुन्हा एकदा स्वत:च्या पायावर उभा राहिला.
रुस्तुम राठोड असे या रुग्णाचे नाव आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने नातेवाईकांनी त्याला घाटीत दाखल केले. उंचावरून पडल्याने मणका आणि नस दबली गेली होती. मानेच्या नसा या हात आणि पायांच्या नियंत्रणासाठी महत्त्वाची भूमिका निभावतात. तेथे दुखापत झाली तर हात, पायांना कायमचे अपंगत्व येण्याची भीती असते. ही सगळी परिस्थिती ओळखून अस्थिव्यंगोपचार विभागातील डाॅक्टरांनी रुग्णावर शस्त्रक्रिया केली. त्याच्या दबलेल्या नसा मोकळ्या करण्यात आल्या. २० दिवसांनंतर रुस्तुम पुन्हा दोन्ही पायांची हालचाल करू शकत आहेत. त्याबरोबर ते आता आधार घेऊन उभे राहू शकत आहेत. आगामी १० ते १५ दिवसांत ते पूर्वीप्रमाणे चालू शकतील, असे डाॅक्टरांनी सांगितले. डाॅक्टरांनी केलेल्या उपचारामुळे अपंग होण्यापासून बचावल्याची भावाना रुग्ण आणि नातेवाईकांनी व्यक्त केली. अस्थिव्यंगोपचार विभागप्रमुख डाॅ. एम. बी. लिंगायत, डाॅ. अनिल धुळे, डाॅ. मुक्तदिर अन्सारी, डाॅ. सतीश गवळी, डाॅ. नीलेश कचनेरकर, डाॅ. अब्दुल्ला अन्सारी आणि निवासी डाॅक्टर, परिचारिकांनी यासाठी प्रयत्न केले.
९० टक्के रुग्णांवर यशस्वी उपचार
अपघातामुळे हात, पाय मोडल्यामुळे उपचारासाठी येणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. वर्षभरात अशा जवळपास १८०० रुग्णांवर उपचार करून हाता, पायाला अपंगत्व येणे रोखण्यात आले. त्याबरोबर जन्मजात पाय वाकडे असलेल्या ९० टक्के रुग्णांवर यशस्वी उपचार होत आहेत. अपघातात डोक्याला मार लागू नये, यासाठी हेल्मेटचा वापर केला पाहिजे.
- डाॅ. एम. बी. लिंगायत, अस्थिव्यंगोपचार विभागप्रमुख, घाटी