डाॅक्टरांना देव म्हणतात, मग त्यांच्यावर विश्वास ठेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 03:41 PM2022-07-01T15:41:25+5:302022-07-01T15:42:23+5:30
डाॅक्टर्स डे : डाॅक्टर म्हणाले, नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी, आमच्याकडे कोणी येऊच नये
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : डाॅक्टरांकडे आजही देव म्हणून पाहिले जाते. त्यांच्याकडे गेले की रुग्ण बरा होणार, असा विश्वास असतो. मात्र, काही कमी जास्त झाले तर डाॅक्टरांना दोषी धरले जाते. रुग्णांसाठीच २४ तास ते कार्यरत असतात. त्यामुळे डाॅक्टरांवर विश्वास ठेवला पाहिजे. त्यातही प्रत्येकाने स्वत:ची आणि इतरांची काळजी घेतली तर आजारी पडण्याची वेळच येणार नाही आणि डाॅक्टरांकडे जाण्याची वेळच पडणार नाही, अशी भावना ‘डाॅक्टर डे’ निमित्त शहरातील डाॅक्टरांनी व्यक्त केली.
दरवर्षी १ जुलैला ‘डाॅक्टर्स डे’ साजरा केला जातो. घाटी, जिल्हा रुग्णालय, मनपाची आरोग्य केंद्रे आणि खासगी रुग्णालय, अशा प्रत्येक ठिकाणचे डाॅक्टर हे रुग्णांसाठीच कार्यरत आहेत. परंतु, काही जणांमुळे सर्वांना त्रास सहन करावा लागतो. काही आजारांवर उपचार नसतात. तरीही डाॅक्टर पूर्ण प्रयत्न करीत असतात. वर्षातून एकदा डाॅक्टरांच्या कामाचे कौतुक होता कामा नये. डाॅक्टरांवरील विश्वास कायम राहावा, त्यासाठी डाॅक्टर प्रयत्नशील असतात, असे शहरातील डाॅक्टरांनी सांगितले.
रात्री-बेरात्री सेवा
डाॅक्टरांना रुग्णांसाठी रात्री-बेरात्री कधीही जावे लागते. रुग्ण, नातेवाइकांनी डाॅक्टरांवर विश्वास ठेवला पाहिजे. नव्या डाॅक्टरांनी पूर्ण क्षमतेने आणि भविष्यातील परिस्थितीचा विचार करून रुग्णसेवा द्यावी.
- डाॅ. सचिन फडणीस, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन
६५० वर महिला डाॅक्टर
औरंगाबादेत ६५० पेक्षा अधिक महिला डाॅक्टर कार्यरत आहेत. डाॅक्टर म्हणून रुग्णसेवा देणे, हे सर्वाधिक आनंददायी वाटते. नागरिकांनी स्वत:च्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे.
- डाॅ. उज्ज्वला दहिफळे, सचिव, आयएमए
वास्तव स्वीकारावे
डाॅक्टर म्हणून प्रत्येक रुग्ण का पूर्णपणे बरे करू शकत नाही, असा प्रश्न अनेकदा पडतो. रुग्ण आणि नातेवाईक यांच्या डोळ्यातील मृत्यू आणि कॅन्सरबद्दलची भीती रोजच अनुभवते. परंतु, मृत्यू नैसर्गिक आहे. ते वास्तव स्वीकारायला हवे.
- डाॅ. अर्चना राठोड, शासकीय कर्करोग रुग्णालय
डाॅक्टरांना समजून घ्या
घाटीत ५५० निवासी डाॅक्टर रुग्णसेवा देतात. कामाचा अधिक भार आहे. औषधी उपलब्ध नसल्यावरच चिठ्ठी लिहून देतो. पण, त्याला डाॅक्टर जबाबदार नाही. रुग्ण, नातेवाइकांनी डाॅक्टरांना समजून घेतले पाहिजे.
- डाॅ. अक्षय क्षीरसागर, अध्यक्ष, मार्ड