पहिल्या लाटेत सेवा अधिग्रहित होऊनही डॉक्टरांची पाठ, आता पुन्हा शोधाशोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:02 AM2021-04-02T04:02:06+5:302021-04-02T04:02:06+5:30
औरंगाबाद : कोरोनाच्या पहिल्या लाटेत गतवर्षी शासकीय रुग्णालयांसाठी खासगी डॉक्टरांची सेवा अधिग्रहित करण्यात आली होती. परंतु, दोन-चार डॉक्टर वगळता ...
औरंगाबाद : कोरोनाच्या पहिल्या लाटेत गतवर्षी शासकीय रुग्णालयांसाठी खासगी डॉक्टरांची सेवा अधिग्रहित करण्यात आली होती. परंतु, दोन-चार डॉक्टर वगळता अन्य कोणीही रूजू झाले नव्हते. पहिली लाट ओसरल्यानंतर याचा सर्वांना विसर पडला. आता कोरोना रुग्णसंख्या वाढल्यानंतर पुन्हा एकदा घाटी रुग्णालयाला स्पेशालिस्ट डॉक्टरांची शोधाशोध करावी लागत आहे.
जिल्ह्यात फेब्रुवारीपासून कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत गेल्याने शासकीय डॉक्टरांची सेवा आता अपुरी पडत आहे. विशेषत: घाटी रुग्णालयात गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी ४० स्पेशालिस्ट डॉक्टरांची आवश्यकता आहे. परंतु, शहरातील ३५पेक्षा अधिक खासगी रुग्णालयांत कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांतील डॉक्टरांवरही रुग्णसेवेचा भार वाढला आहे. घाटीत दाखल होणाऱ्या गंभीर रुग्णांची परिस्थिती पाहता, स्पेशालिस्ट डॉक्टरांची आवश्यकता आहे. परंतु, डॉक्टर मिळत नसल्याने आहे त्या मनुष्यबळात रूग्णसेवा देण्याची कसरत घाटी प्रशासनाला करावी लागत आहे. कंत्राटी स्वरुपात रूजू व्हा, मानधन तत्वावर रुग्णसेवा द्या अथवा सेवाभावाने घाटीत सेवा द्या, असे आवाहन करण्याची वेळ ओढवली आहे.
७०च्या आसपास डॉक्टरांची सेवा अधिग्रहित
जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने गतवर्षी सप्टेंबरमध्ये शासकीय डॉक्टरांची सेवा अपुरी पडत होती. त्यामुळे शासकीय रुग्णालयांसाठी खासगी डॉक्टरांची सेवा अधिग्रहित करण्यात आली. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही खासगी डॉक्टर शासकीय रुग्णालयात रुजू होण्यास तयार नव्हते. शहरातील फ्रिलान्सिंंग व खासगी व्यवसाय करणाऱ्या ७०च्या आसपास डॉक्टरांची सेवा मनपा व शासकीय रुग्णालयामध्ये अधिग्रहित करण्यात आली होती.
-
प्रस्ताव मंजूर
घाटीला स्पेशालिस्ट डॉक्टरांची आवश्यकता आहे. हे डॉक्टर घेण्यासाठी प्रस्तावदेखील मंजूर झाला आहे. घाटी रुग्णालयासाठी ४० स्पेशालिस्ट डॉक्टर घेण्यात येणार आहेत. घाटीत सेवाभावाने रुग्णसेवा देण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
- डॉ. वर्षा रोटे, प्रभारी अधिष्ठाता, घाटी
प्रतिसाद मिळेना
डॉक्टर पाहिजे म्हणून घाटी प्रशासनाकडून विचारणा करण्यात आली आहे. सगळ्याच खासगी रुग्णालयांतील डॉक्टरांवर रुग्णसेवेचा भार वाढला आहे. शासनाकडून चांगले मानधन दिले जाणार आहे. परंतु, फारसा प्रतिसाद मिळत नाही.
- डॉ. संजय पाटणे, अध्यक्ष, फिजिशियन असोसिएशन