डॉक्टर्स डे : डॉक्टरांचा जॉब ‘थँकलेस’ आहे का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 01:25 PM2019-07-01T13:25:33+5:302019-07-01T13:27:16+5:30

देव नाही; परंतु रुग्णांच्या वेदना कमी करण्यात डॉक्टरांची महत्त्वाची भूमिका

Doctor's Day: Do the job of the doctor be 'Thankless'? | डॉक्टर्स डे : डॉक्टरांचा जॉब ‘थँकलेस’ आहे का ?

डॉक्टर्स डे : डॉक्टरांचा जॉब ‘थँकलेस’ आहे का ?

googlenewsNext

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : आयुष्यातील छोट्या-मोठ्या शारीरिक, मानसिक वेदना कमी करण्याबरोबर चांगले आयुष्य देण्यामध्ये डॉक्टरांची भूमिका महत्त्वाची असते. काही कालावधीपूर्वी डॉक्टर म्हणजे देव, अशी विचारधाराही होती; परंतु गेल्या काही वर्षांत रुग्ण दगावल्यानंतर डॉक्टरांवर हल्ले होण्याच्या घटना होत आहेत. पैसा दिला म्हणजे रुग्ण बरा झाला पाहिजे, अशी मानसिकताही दिसते. त्यामुळे डॉक्टरांचा जॉब ‘थँकलेस’ आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

दरवर्षी १ जुलै रोजी ‘डॉक्टर्स डे’ साजरा केला जातो. प्रत्येक डॉक्टर रुग्णांच्या आरोग्यासाठी अहोरात्र सेवा देत असतो. अलीकडे डॉक्टर-रुग्णांतील संवाद कुठेतरी हरवत आहे. डॉक्टर-रुग्ण नात्याचा बांध सैल होत आहे. त्यातून अनेक प्रश्नांना सामोरे जाण्याची वेळ या दोन्ही घटकांवर येत आहे. काही दिवसांपूर्वी कोलकाता येथे डॉक्टरांवर हल्ला झाला आणि त्याचे देशभरात पडसाद उमटले. डॉक्टरांवर हल्ले झाल्याची पहिलीच घटना नव्हती. रुग्णालयात अधिक पैसा घेतात. त्यामुळे रुग्ण बरा झालाच पाहिजे, अशी मानसिकता वाढत आहे. त्यातून अशा घटना अलीकडे वाढत आहेत.

रुग्णालयात डॉक्टर आणि रुग्ण, नातेवाईकांत वेळोवेळी वाद होण्याच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी विविध माध्यमांतून प्रयत्न करण्यात येत आहे. समाजाची अपेक्षा पूर्ण करणारा, नीतिमत्ता बाळगणारा, समाजाबरोबर उत्तम संवाद साधणारा डॉक्टर ही काळाची गरज आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ‘डॉक्टर्स डे’निमित्त शहरातील डॉक्टरांशी संवाद साधण्यात आला.


प्रामाणिक प्रयत्न
रुग्ण डॉक्टर संवाद वाढविण्यासोबत वैद्यकीय क्षेत्रातील मर्यादांचा स्वीकार समाजाने करणे गरजेचे आहे. प्रत्येक डॉक्टर शंभर टक्के प्रामाणिकपणे प्रयत्न करतोच. आजही बहुतांश लोक डॉक्टरांवर विश्वास ठेवतात. काही थोड्या त्रासदायक लोकांमुळे सर्वांना भोगावे लागते.
-डॉ. किरण बोडखे, मानसोपचारतज्ज्ञ
 
सेवा हा कणा
सेवा हा वैद्यकीय व्यवसायाचा कणा आहे. पैसा आणि प्रतिष्ठा या व्यवसायात आपोआप मिळत असतात. त्यासाठी फक्त नि:स्वार्थ काम हा एकच हेतू असायला हवा. रुग्णाच्या पाठीवरून एक प्रेमाचा हाथ जरी ठेवला तरी त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास, आजारावर मात करण्याची शक्ती निर्माण होते. 
-डॉ. फारुक पटेल

सेवाभाव वृत्ती 
ग्राहक संरक्षण कायदा झाला. त्यामुळे डॉक्टर-रुग्णसंबंध एक प्रकारे व्यवसाय झाला. मात्र, तरीही डॉक्टर सेवाभाव वृत्ती ठेवतात; परंतु रुग्णांचे काही हक्क आणि कर्तव्य आहेत. काही तपासण्या सांगितल्या, तर शंका घेतली जाते. काही पटले नाही, तर रुग्णांनी विचारले पाहिजे. डॉक्टर जे सांगतात, त्याचे पालनही केले पाहिजे.
-डॉ. वर्षा वैद्य, बालमेंदूविकारतज्ज्ञ

गैरसमज दूर व्हावा
डॉक्टरदेखील सर्वसामान्य व्यक्ती असतात. ते रुग्णांच्या मदतीसाठीच असतात. जगात प्रत्येक क्षेत्रात चांगले आणि वाईट लोक असतात. वैद्यकीय क्षेत्रात काही लोक चुकीचे वागत असतील; परंतु त्यांच्यामुळे संपूर्ण डॉक्टरच चुकीचे आहेत, असे नाही. डॉक्टर फक्त पैसा घेतात, हा गैरसमज झाला आहे. तो दूर झाला पाहिजे.
-डॉ. सना कादरी-खिलजी, मनोविकारतज्ज्ञ

९९ टक्के रुग्णांचा विश्वास
डॉक्टरांचा जॉब पूर्णपणे थँकलेस झालेला नाही. समाजात काही प्रमाणात डॉक्टरांविषयी अविश्वास, रोष आहे; परंतु ९९ टक्के रुग्ण डॉक्टरांवर विश्वास ठेवतात. डॉक्टरांकडूनही कधी-कधी चूक होऊ शकते; परंतु त्यावर मारहाण करणे हे योग्य नाही. कायदेशीर मार्ग आहे.
-डॉ. आनंद पिंपरकर, नेत्रतज्ज्ञ 

डॉक्टरांवर विश्वास हवा
सध्या परिस्थिती बदललेली आहे. दुकानदार समजून डॉक्टरांकडून सेवा घेतली जाते. पैसा दिला म्हणजे त्याचा मोबदला मिळाला पाहिजे, अशी मानसिकता दिसते; परंतु  कोणत्या टप्प्यावर उपचार घेतला जातो, हे अधिक महत्त्वाचे असते. 
-डॉ. खुर्रम खान, बालरोग 
व स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ

संबंध सुधारावेत
रुग्ण-डॉक्टरांचे संबंध सुधारण्याकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे. डॉक्टरांनी रुग्णांचे समाधान केले पाहिजे. पूर्वी डॉक्टरांना देव मानत असत; परंतु आता खर्च वाढला आहे. त्यामुळे रुग्णांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. काही गोष्टींवर उपचार नसतो. तरीही डॉक्टर पूर्ण प्रयत्न करतात.
-डॉ. वसंत कंधारकर, बालरोगतज्ज्ञ
 

Web Title: Doctor's Day: Do the job of the doctor be 'Thankless'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.