डॉक्टरचे फेसबुक खाते हॅक; मित्रांना गेले पैश्यांची मागणी करणारे मेसेज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 06:21 PM2020-05-23T18:21:40+5:302020-05-23T18:22:09+5:30
जवळपास १०० मित्रांना तातडीने पैसे हवे आहेत असे मेसेज गेले
परळी : शहरातील डॉ. अशोक लोढा यांचे फेसबुक मेसेंजर हॅक करून त्यांच्या फ्रेंड लिस्टमधील १०० मित्रांना पैश्याची मागणी करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मात्र फेसबुक खाते हॅक झाल्याची माहिती वेळीच कळल्याने पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी डॉक्टर अशोक लोढा यांनी शुक्रवारी संभाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
परळी येथील दंतचिकित्सक डॉक्टर अशोक लोढा यांचे फेसबुकवर खाते आहे. यासोबतच फेसबूक मेसेंजर ही त्यांच्या मोबाईलमध्ये आहे. मात्र वेळेअभावी ते कधीच मेसेंजरचा वापर करत नाहीत. याचाच गैरफायदा घेत पुणे येथील एका व्यक्तीने त्यांचे हे मेसेंजर खाते हॅक केले आणि त्यांच्या मित्र यादीतील अनेकांना 'मला आता तातडीने दहा हजार रुपयांची आवश्यकता आहे, ऑनलाईन पाठवा' असे मेसेज पाठवले. अचानक डॉक्टरांचा मेसेज आल्यामुळे त्यांना खरोखरच पैशाची आवश्यकता असेल असे समजून अनेकांनी त्या व्यक्तीने दिलेल्या नंबरवर पैसे पाठवण्याची तयारी केली होती.
असाच मेसेज पद्मावती भागातील नगरसेवक विजय भोईटे , प्रशांत जोशी यांना आला असता त्यांनी तातडीने डॉक्टर लोढा यांच्याशी संपर्क साधला. डॉक्टर लोढा यांनी लागलीच फेसबुकवरील मित्रांना माझे अकाऊंट हॅक झाले असून आपल्याकडे कोणी पैशाची मागणी केल्यास ती देऊ नये असे मेसेज केले. यामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान, डॉ. लोढा यांनी संशयित आरोपीची माहिती काढून शुक्रवारी संभाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पवार हे करत आहेत.