वेबिनारद्वारे डॉक्टरांचे मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:02 AM2021-04-05T04:02:02+5:302021-04-05T04:02:02+5:30
-- आरोग्यपूर्ण जीवनशैली दिवस साजरा औरंगाबाद : शहरात २७ मार्च हा दिवस आरोग्यपूर्ण जीवनशैली दिवस म्हणून साजरा करण्यात आला. ...
--
आरोग्यपूर्ण जीवनशैली दिवस साजरा
औरंगाबाद : शहरात २७ मार्च हा दिवस आरोग्यपूर्ण जीवनशैली दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यात विविध शाळांमधील किशोरवयीन मुलांसाठी आरोग्यपूर्ण जीवनशैली या विषयावर प्रश्नमंजुषा घेण्यात आली. यामध्ये शारदा मंदिर, एसबीअओए,पोद्दार स्कूल, टेंडर केअर होम या शाळांमधील संघ सामील झाले होते. या प्रश्नमंजुषेत शारदा मंदिर प्रशाला विजयाची मानकरी ठरली. या स्पर्धेतील विजेत्यांना घरपोच बक्षिसेही देण्यात आली. योग तज्ज्ञ गणेश कनोजिया यांनी मुलांना लहान वयातील योगाचे महत्त्व समजावून सांगितले. धृती भाले या विद्यार्थिनीने या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. कार्यक्रम यशस्वितेसाठी डॉ.रोशनी सोधी, डॉ.नीती सोनी यांनी परिश्रम घेतले.
---
डाऊन सिंड्रोमवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
औरंगाबाद : औरंगाबाद बालरोग तज्ज्ञ संघटनेतर्फे ‘डाऊन्स सिंड्रोम दिन’ म्हणून आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. विशेष मुलांसाठी असलेल्या विविध शाळांतील विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी सहभाग नोंदविला. बालमानसशास्त्रज्ञ मधुरा आन्विकर यांनी डाऊन्स सिंड्रोमच्या मुलांच्या वर्तन समस्या व त्यावरील उपाय अतिशय सोप्या शब्दांत सांगितले. बालआंतरग्रंथी तज्ज्ञ डॉ.संध्या कोंडपल्ले यांनी डाऊन्स सिंड्रोमच्या मुलांमधील विविध हार्मोन्सच्या समस्यांबद्दल माहिती व त्यावरील उपाय सांगितले. उपस्थितांच्या प्रश्नांना बालमेंदूरोग तज्ज्ञ डॉ.वर्षा वैद्य, डॉ.माधवी शेळके यांनी उत्तरे दिली. डॉ.राजेंद्र खडके, बालरोग तज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ.श्याम खंडेलवाल यांनीही चर्चासत्रात भाग घेऊन पालकांना मार्गदर्शन केले.
----
मुलींच्या संगोपनाबाबत पालकांना मार्गदर्शन
औरंगाबाद : किशोरवयीन मुलांच्या सप्ताहानिमित्त २८ मार्च रोजी आयोजित कार्यक्रमात बालमानसशास्त्रज्ञ डॉ.तृप्ती बोरूळककर यांनी मुलींच्या संगोपनाबाबत पालकांना मार्गदर्शन केले. ॲड.प्रज्ञा तळेकर यांनी मुलींच्या स्वसंरक्षणार्थ व पुढील आयुष्यातील त्यांच्या हक्कांबद्दल असलेल्या कायद्यांची माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ, देश को आगे बढाओ’ या घोषवाक्यावरवर आधारित काव्यलेखनाच्या स्पर्धेतील विजेत्यांचे सत्कार करण्यात आला. काही निवडक कवितांचे वाचनही स्पर्धकांनी केले. सूत्रसंचालन डॉ.मनिष कुलकर्णी यांनी केले.
---
नव्या वीजजोडणीची स्थिती ऑनलाइन
औरंगाबाद : महावितरणतर्फे घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, तसेच कृषी अशा सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांना नवीन वीजजोडणीच्या अर्जासाठी महावितरणचे संकेतस्थळ किंवा मोबाइल ॲपवर ऑनलाइन सुविधा देण्यात आली आहे. त्याप्रमाणे, अर्ज प्राप्त झाल्यानंतर महावितरणकडून नवीन वीजजोडणी देण्याची अंतर्गत प्रक्रियाही ऑनलाइन करण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज केल्यापासून त्याची मंजुरीच्या प्रक्रियेतील स्थिती (ट्रॅक स्टेटस) पाहण्यासाठी वीजग्राहकांना ऑनलाइन सोय उपलब्ध आहे, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली.