रुग्णांना दाखल करणे नकोच, आपली ‘ओपीडी’च बरी बाबा; काही डाॅक्टरांनी बंद केली ‘आयपीडी’!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 12:13 PM2022-04-25T12:13:31+5:302022-04-25T12:14:07+5:30
तर नवीन डाॅक्टर ‘आयपीडी’ सुरू करण्याचे धाडस करेनात
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : एखाद्या रुग्णाची प्रकृती गंभीर झाली तर त्याला आंतररुग्ण विभागात (आयपीडी) दाखल करून आवश्यक ते उपचार द्यावे लागतात. पण, अनेक कारणांमुळे शहरातील काही डाॅक्टरांनी थेट ‘आयपीडी’ सेवा बंद करून केवळ ‘ओपीडी’च सुरू ठेवली आहे, तर नवीन डाॅक्टरही केवळ ‘ओपीडी’वरच भर देत असल्याने आरोग्य क्षेत्रातून चिंता व्यक्त होत आहे.
औरंगाबाद शहर मेडिकल हब म्हणून उदयास येत आहे. मल्टिस्पेशालिटी, सुपरस्पेशालिटी आणि काॅर्पोरेट रुग्णालयांचे जाळे वाढत आहे. नवीन रुग्णालय सुरू करताना डाॅक्टरांना गलेलठ्ठ पगाराची ऑफर, पॅकेज दिले जात आहे. खासगी रुग्णालयांची संख्या ५६० वर गेली आहे. या सगळ्यात ‘आयपीडी’ सेवा बंद करून केवळ ‘ओपीडी’त पूर्णवेळ देण्याकडे अनेक डाॅक्टरांचा कल दिसत आहे.
नियम सोपे हवेत
रुग्णालयांना अनेक नियमांची पूर्तता करावी लागते. नियमांचा डाॅक्टरांना त्रास होता कामा नये. याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशन प्रयत्नशील आहे.
- डाॅ. सचिन फडणीस, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन
१२ फिजिशियनची आयपीडी बंद
गेल्या वर्षभरात जवळपास १२ फिजिशियन डाॅक्टरांनी आयपीडी बंद केली. कोविड काळात झळ बसली. रुग्ण-डाॅक्टरांमध्ये वादाच्या घटना होतात. सोयीसुविधांचा खर्च आणि उत्पन्न यात तफावत अशा कारणांनी आयपीडी बंद केली जातेय.
- डाॅ. संजय पाटणे, अध्यक्ष, फिजिशियन असोसिएशन
ग्रुप प्रॅक्टिसवर भर :
चार ते पाच डाॅक्टर एकत्र येऊन ग्रुप प्रॅक्टिस करण्यावर भर दिला जात आहे. ५ ते ६ ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञांनी आयपीडी बंद केली.
- डाॅ. संध्या कोंडपल्ले, सचिव, औरंगाबाद बालरोगतज्ज्ञ संघटना
जुन्या रुग्णालयांना नियमात अडकवू नये
नवीन रुग्णालय सुरू होत असेल तर नियमांचे पालन करणे बंधनकारक असावे. परंतु जुन्या रुग्णालयांना नव्या नियमांची पूर्तता करणे अवघड होते. त्यामुळे जुन्या रुग्णालयांना नव्या नियमात अडकविता कामा नये. रुग्णांच्या नातेवाईकांचे आक्रमक वर्तन, विविध खर्चांमुळे ‘आयपीडी’ चालविणे अवघड होते. नव्या डाॅक्टरांनाही ‘आयपीडी’ सुरू करण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.
- डाॅ. अभय जैन, बालरोगतज्ज्ञ
‘आयपीडी’ बंद करण्याची कारणे :
-वयोमानामुळे ‘आयपीडी’त वेळ देणे अशक्य.
- ओपीडीतच रुग्णांची वाढती गर्दी.
-‘आयपीडी’साठी सोयीसुविधांचा खर्च न परवडणारा.
- रुग्णालय चालविताना नियमांची पूर्तता करण्यासाठी होणारा त्रास.
-‘आयपीडी’त रुग्णांसोबत होणारे वाद.
- काॅर्पोरेट रुग्णालयात रुग्णसेवा देण्यावर भर.