कोरोना फक्त पॅसेंजर रेल्वेतूनच पसरतो का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:02 AM2021-07-16T04:02:12+5:302021-07-16T04:02:12+5:30
संतोष हिरेमठ औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होऊन दीड वर्ष उलटले आहे. कोरोना संपला नसला तरी विळखा कमी झाल्याने ...
संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होऊन दीड वर्ष उलटले आहे. कोरोना संपला नसला तरी विळखा कमी झाल्याने जवळपास सर्वच व्यवहार सुरू झाले आहेत. मात्र, अद्यापही पॅसेंजर रेल्वे सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे रोज नोकरी, व्यवसाय, शिक्षणासाठी अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत, आर्थिक परवड होत आहे. कोरोना फक्त पॅसेंजर रेल्वेतूनच पसरतो का, असा सवाल या प्रवाशांतून उपस्थित होत आहे.
औरंगाबादहून सध्या सर्व रेल्वे विशेष रेल्वे म्हणून धावत आहेत. या रेल्वेत जनरल तिकीट बंद आहे. आरक्षण तिकिटाशिवाय प्रवाशांना प्रवास करता येत नाही. जनरल तिकिटाअभावी आरक्षण तिकिटासाठी अधिक रक्कम मोजण्याची वेळ सर्वसामान्यांवर ओढवत आहे. रोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने पॅसेंजर रेल्वे महत्त्वपूर्ण ठरतात. त्यामुळे पॅसेंजर रेल्वे कधी धावणार, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. पॅसेंजर रेल्वे यापुढे डेमू रेल्वे म्हणून चालविण्याच्या हालचाली सुरू असल्याचे रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे सांगण्यात आले. प्रवाशांच्या सुविधेसाठी जालना ते नाशिक आणि जालना ते इगतपुरी डेमू पॅसेंजर सुरू करण्यात यावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे नमो रेल्वे संघटनेचे अध्यक्ष गौतम नाहाटा यांनी एका निवेदनाद्वारे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे.
सध्या सुरू असलेल्या स्पेशल ट्रेन
- सचखंड एक्स्प्रेस
- नंदीग्राम एक्स्प्रेस
- देवगिरी एक्स्प्रेस
- जनशताब्दी एक्स्प्रेस
- तपोवन एक्स्प्रेस
- अजंता एक्स्प्रेस
- रेणीगुंठा एक्स्प्रेस
- मराठवाडा एक्स्प्रेस
-----
मग पॅसेंजर बंद का?
-नांदेड-नगरसोल पॅसेंजर
-निजामाबाद - पुणे पॅसेंजर
-नांदेड - दौंड पॅसेंजर
- काचीगुडा - नगरसोल पॅसेंजर
- जालना - नगरसोल डेमू पॅसेंजर
---
एक्स्प्रेसचा प्रवास परवडत नाही
एक्स्प्रेसचे नियम लावा
पेट्रोलचे दर वाढले आहे. त्यामुळे रोज अप-डाऊन करण्यासाठी दुचाकी वापरणे परवडत नाही. त्यामुळे पॅसेंजर सुरू करणे गरजेचे आहे. डेमू सुरू होणार म्हटले जाते. पॅसेंजर अथवा डेमू लवकर सुरू केल्या पाहिजेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे नियम एक्स्प्रेस रेल्वेंना आहेत, तेच नियम पॅसेंजरलाही लावता येतील.
- राजकुमार सोमाणी, रेल्वे प्रवासी संघटना
---
कमाईचे अर्धे पैसे प्रवासात
कामासाठी रोज लासूरहून ये-जा करावी लागते. रोज जेवढे पैसे मिळतात, त्यातील अर्धे पैसे ये-जा करण्यात जात आहेत. त्यामुळे आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते. पॅसेंजर रेल्वे लवकरात लवकर सुरू केल्या पाहिजेत. रोज वाहनाने ये-जा करणे आर्थिकदृष्ट्या शक्य नाही.
- आसीफ मुन्ना शहा, प्रवासी
---
मास्कचा वापर करावा
प्रवाशांनी प्रवासादरम्यान मास्कचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे. आरक्षण तिकीट काढूनच रेल्वे प्रवास केला पाहिजे. त्याबरोबर प्लॅटफाॅर्म तिकीट काढूनच रेल्वे स्टेशनवर प्रवाशांसोबत येणाऱ्या इतरांनी प्रवेश केला पाहिजे.
- लक्ष्मीकांत जाखडे, स्टेशन व्यवस्थापक