श्वानाने स्वत:चे दूध पाजून जगविले वराहाच्या पिलांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:07 AM2021-01-13T04:07:10+5:302021-01-13T04:07:10+5:30
शिवाजी महाकाळ फर्दापूर : आईच्या ममत्वाला जगात कोठेही तोड नाही. मग ती आई मानवातील असो की, प्राण्यांमधील. आई ही ...
शिवाजी महाकाळ
फर्दापूर : आईच्या ममत्वाला जगात कोठेही तोड नाही. मग ती आई मानवातील असो की, प्राण्यांमधील. आई ही मायेने ओतप्रोत भरलेला सागर आहे. तिच्या प्रेमापुढे स्वर्गही फिका पडतो. अशीच एक मानवालाही अचंबित करणारी घटना सोयगाव तालुक्यातील फर्दापुरात अनुभवायला येत आहे. आईच्या मायेपासून पारख्या झालेल्या वराहाच्या दोन नवजात पिलांना परिसरातील भटक्या श्वानाने स्वत:चे दूध पाजून जीवनदान दिले. गेल्या महिनाभरापासून ती आई स्वत:च्या पिलांसह वराहाच्या त्या पिलांनाही दूध पाजत आहे. हे भिन्न वर्गीय मातृत्व परिसरात चर्चेचा विषय ठरले आहे.
फर्दापुरासह परिसरातील काही गावांमध्ये वराहाचा व्यवसाय करणाऱ्या काही लोकांनी वराह आणून सोडले आहेत. हे वराह मोठे झाल्यानंतर ते लोक त्यांना पकडून विकण्यासाठी नेतात. फर्दापुरात सोडण्यात आलेल्या वराहांना पकडण्यासाठी महिनाभरापूर्वी सदर व्यावसायिक आले होते. त्यांनी पकडून नेलेल्या वराहांमध्ये नुकत्याच पिलांना जन्म दिलेल्या एका मादी वराहाचाही समावेश होता. तिला पकडून नेल्यानंतर तिची पिले अनाथ झाली. यातील काही पिले दगावली, तर दोन पिलांना पाहून परिसरातील एका श्वानामधील ममत्व जागे झाले. तिने स्वत:च्या पिलांबरोबर या नवजात वराहाच्या पिलांनाही दूध पाजून जीवनदान दिले आहे. हे पाहून नागरिकही अचंबित होत आहेत.
चाैकट
महिनाभरापासून दूध पाजून करीत आहे सांभाळ
आईचे छत्र हरवलेल्या वराहाच्या दोन पिलांना श्वानाने आपल्या दूध पाजून जीवनदान दिले. गेल्या महिनाभरापासून या श्वानाने स्वत:च्या व वराहाच्या पिलांमध्ये कोणताही फरक केला नाही. ही बाब मानवालाही लाजविणारी आहे. श्वानाच्या या ममत्वाला अनेकांनी सलाम केला आहे.