‘समृद्धी’ महामार्गावर श्वानांचा सुळसुळाट, अपघातांमध्ये वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 07:11 AM2022-12-29T07:11:43+5:302022-12-29T07:12:26+5:30
दुचाकीचालकही बिनधास्त; गाई, म्हशी, शेळ्यांसह इतरांचा रस्त्यालगत वावर
शेख मुनीर, लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या समृद्धी महामार्गाचे पंधरा दिवसांपूर्वीच उद्घाटन झाले. त्यानंतर हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या महामार्गावर सायकल, ट्रॅक्टर, रिक्षा, दुचाकींसह प्राणी, पायी चालणाऱ्यांनाही परवानगी नाही. मात्र, सावंगी ते लासूर परिसरापर्यंतच्या महामार्गावर अनेक ठिकाणी श्वानांचा सुळसुळाट दिसून आला. त्याशिवाय रस्त्यालगतच्या कठड्याजवळ गाय, म्हशी, शेळीसह इतर प्राण्यांचा वावरही ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आला.
मार्गावर १५ दिवसांत मोठ्या प्रमाणात अपघातही घटनाही झाले. वेगात गाडी असताना अचानक प्राणी समोर येत असल्याच्या घटना होत आहेत. श्वान झुंडीनेच ‘समृद्धी’वर फिरतात. नागपूरहून शिर्डीकडे जाणाऱ्या क्रूझरसमोर अचानक एक श्वान समोर आले. चालकाने कौशल्याने परिस्थिती हाताळल्यामुळे भीषण अपघात टळला. या मोकाट श्वानांमुळे ‘समृद्धी’वर भीषण अपघाताचा धोका पाहणीत दिसला.
इतर प्राणीही सुसाट...
समृद्धीवर प्राणी, जनावरे, माणसे, वाहने घुसू नयेत यासाठी लोखंडी कठडा आहे. परंतु, कठड्याखालून श्वान, मांजरे थेट रस्त्यावर येतात. भिंतीच्या आत गाय, म्हशी, शेळीसह इतर प्राणी चारण्यासाठी शेतकरी घेऊन येत असल्याचेही दिसून आले.
समृद्धीवर राज्य रस्ते विकास महामंडळ आणि पोलिसांची गस्त नियमित सुरू आहे. सुरक्षा कठड्याला जनावरे बांधण्यापूर्वी नागरिकांनीदेखील विचार करावा. - बी. पी. साळुंके, मुख्य अभियंता, एमएसआरडीसी
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"