सर्वच पक्षांकडून वर्चस्वाचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:06 AM2021-01-19T04:06:36+5:302021-01-19T04:06:36+5:30
फुलंब्री : तालुक्यात झालेल्या ४९ ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून, सर्वच पक्ष आपले वर्चस्व असल्याचा दावा करत ...
फुलंब्री : तालुक्यात झालेल्या ४९ ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून, सर्वच पक्ष आपले वर्चस्व असल्याचा दावा करत आहेत. तालुक्यात एकूण ५३ ग्रामपंचायत निवडणुका होत्या. यातील चार ग्रा. पं. निवडणुका बिनविरोध झाल्याने उर्वरित निवडणूक झाली. तहसील कार्यालयाच्या परिसरात दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व निकाल हाती आले होते.
तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायतींच्या आखाड्यात आम्हीच वरचढ असल्याचा दावा काँग्रेस व भाजपकडून करण्यात आला आहे. काँग्रेसच्या ताब्यात १२ ग्रामपंचायती तसेच महाविकास आघाडीच्या ताब्यात १८ ग्रामपंचायती आल्या असल्याचे त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. यात शिवसेनेनेसुद्धा उडी घेत आम्ही सर्वाधिक जागा जिंकल्या असल्याचा दावा करण्यात आला आहे. भाजपकडून ३० ग्रामपंचायती ताब्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
----
प्रमुखांना धक्का ---
कान्होरी ग्रामपंचायतीचे विद्यमान भाजपचे सरपंच प्रभाकर सोटम यांच्या पॅनेलचा धुव्वा उडाला असून, त्यांनासुद्धा पराभवाचे तोंड पाहावे लागले. तसेच वारेगावच्या विद्यमान सरपंच उज्ज्वला बोरसे या पराभूत झाल्या. वाणेगावात बाजार समितीचे संचालक सुभाषराव गायकवाड पराभूत झाले, डोंगरगाव कवाड येथील सरपंच विष्णू भोपळे, उपसरपंच यशोधा राजेंद्र डकले यांचा दारूण पराभव झाला. जातेगाव येथील लहू मानकापे पराभूत झाले असून, अनेकांना या निवडणुकीत पराभवाचे तोंड पहावे लागले.
--- कॅप्शन : फुलंब्री तहसील कार्यालयाच्या आवारात निकाल ऐकण्यासाठी झालेली गर्दी.