एक गुंठा जमीन अंगणवाडीला दान
By Admin | Published: June 21, 2017 12:02 AM2017-06-21T00:02:13+5:302017-06-21T00:09:21+5:30
आडूळ : सामाजिक बांधिलकी म्हणून आडूळ येथील दानशूर दोन शेतकरी मुस्लिम भावंडांनी आडूळ तांडा शिवारातील त्यांच्या मालकीची एक गुंठा जमीन अंगणवाडीसाठी दान दिली आहे.
अंकुश वाघ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आडूळ : सामाजिक बांधिलकी म्हणून आडूळ येथील दानशूर दोन शेतकरी मुस्लिम भावंडांनी आडूळ तांडा शिवारातील त्यांच्या मालकीची एक गुंठा जमीन अंगणवाडीसाठी दान दिली आहे.
पैठण तालुक्यातील खडकी तांडा येथे यापूर्वी अंगणवाडीची सोय नसल्याने येथील बालकांना आडूळ तांडा येथील अंगणवाडीत दररोज पायी यावे लागत होते.
येथील लहान बालकांची दररोजची दयनीय अवस्था पाहून तसेच आपण तांड्यावरील बंजारा समाजासाठी काही तरी करावे या उद्देशाने आडूळ येथील शेख यासीन जंगू व शेख मुनीर जंगू या दोन सख्ख्या शेतकरी भावांनी त्यांच्या आडूळ तांडा शिवारातील गट क्र. ४४६ मधील मालकी व ताब्यातील सामाईक क्षेत्रातील १ गुंठा जमीन विनामोबदला अंगणवाडीसाठी दान दिली. यामुळे येथील लहान बालकांची आता गैरसोय दूर झाली आहे.
सध्या या अंगणवाडीचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून अल्पावधीतच या अंगणवाडीचे उद्घाटन होणार आहे. ही इमारत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. विनामोबदला दान दिलेली ही जागा आता ग्रामपंचायतीकडे हस्तांतर करण्यात आली आहे. आपल्या चिमुकल्यांची दररोजची होणारी पायपीट थांबल्याने तांड्यावरील ग्रामस्थ आनंद व्यक्त करीत असून या दोघा भावांचे सर्वत्र स्वागत होत आहे.
आजोबांनीही मंदिरासाठी दिली जागा
विशेष म्हणजे या दोघा भावांच्या आजोबांनीही सुद्धा मागील काही दिवसांपूर्वी खडकी तांडा शिवारातील त्यांच्या मालकीची सहान जागा हनुमान मंदिरासाठी दान दिली आहे.