रक्तदान करा आणि ‘ग्रीन कार्ड’ मिळवा, जागतिक रक्तदाता दिन विशेष
By संतोष हिरेमठ | Published: June 14, 2023 01:18 PM2023-06-14T13:18:26+5:302023-06-14T13:18:40+5:30
रक्तदात्यांना उपचारात प्राधान्यक्रम
संतोष हिरेमठ, लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर : ग्रीन कार्ड म्हटले की, अमेरिकेत कायमस्वरूपी राहण्याची परवानगी दिल्याचा दस्तऐवज असेच नजरेसमोर येते; परंतु आता शासकीय रक्तपेढीत किमान चार वेळा रक्तदान करणाऱ्या दात्याला ग्रीन कार्ड देण्यात येणार आहे. या ग्रीन कार्डधारक दात्याला उपचारासाठी रुग्णालयात कधीही रांगेत उभे राहावे लागणार नाही. यासह उपचाराला प्राधान्यक्रम दिला जाणार आहे.
रक्तदानाचे प्रमाण वाढण्यासाठी दरवर्षी १४ जूनला जागतिक रक्तदाता दिन साजरा होतो. शासकीय रक्तपेढीसाठी किमान चार वेळा रक्तदान करणाऱ्यांना ग्रीन कार्ड देण्याचा निर्णय झाला आहे. घाटीतील विभागीय रक्तपेढीत लवकरच त्याची अंमलबजावणी होणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात घाटीतील विभागीय रक्तपेढी, जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीसह नऊ रक्तपेढ्या आहेत.
कसा होणार फायदा?
- सरकारी व निमसरकारी रुग्णालयात उपचारासाठी ग्रीन कार्डधारक रक्तदात्याला उपचारासाठी रांगेत उभे राहण्याची सक्ती न करता अग्रक्रम दिला जाईल.
- उपलब्ध असलेल्या सर्व तपासण्या विनाविलंब होणार. त्यामुळे रुग्णाचा वेळ आणि मनस्ताप वाचणार आहे.
निगेटिव्ह रक्तदाते किती?
गरजू रुग्णासाठी निगेटिव्ह रक्त मिळणे अनेकदा अवघड होते. त्यामुळे विभागीय रक्तपेढीने अशा १९५ दात्यांची यादी तयार केली आहे. प्रसंगी त्यांना बोलावले जाते. यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांची पायपीट थांबणार आहे.
रक्तदानासाठी पुढे या!
मानवी रक्त अद्याप तरी कृत्रिमरीत्या तयार करण्यास यश आलेले नाही. त्यामुळे रक्तदानाशिवाय पर्याय नाही. रक्तदानानंतर अवघ्या २४ तासांच्या आत दिलेले रक्त भरून येते. - डाॅ. सुनीता शेरे-हरबडे, सहायक प्राध्यापक, शरीरविकृतीशास्त्र विभाग, घाटी