रक्तदानासाठी दाते सरसावले
By Admin | Published: June 13, 2014 12:14 AM2014-06-13T00:14:57+5:302014-06-13T00:39:54+5:30
हिंगोली : स्टिंग आॅपरेशन’ द्वारे उघडकिस आलेल्या प्रकाराचे वृत्त ‘लोकमत’मध्ये गुरूवारी प्रसिद्ध केल्यानंतर ‘बी पॉझिटिव्ह’ रक्त गरजू रुग्णास देण्यासंदर्भात केलेल्या आवाहना चांगला प्रतिसाद मिळाला
हिंगोली : ‘अख्ख्या मराठवाड्यात बी पॉझिटिव्ह रक्त मिळेना’ या शिर्षकाखाली स्टिंग आॅपरेशन’ द्वारे उघडकिस आलेल्या प्रकाराचे वृत्त ‘लोकमत’मध्ये गुरूवारी प्रसिद्ध केल्यानंतर ‘बी पॉझिटिव्ह’ रक्त गरजू रुग्णास देण्यासंदर्भात केलेल्या आवाहना चांगला प्रतिसाद मिळाला व गुरूवारी १० जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. मागील महिनाभरापासून एकही पिशवी नसलेल्या रक्तपेढीत चार तासांत १० बॅगा जमा झाल्या.
हिंगोली सामान्य रूग्णालयात रक्तपेढी स्थापन झाल्यानंतर पहिल्याच उन्हाळ्यात पाण्याच्या टंचाईप्रमाणे सामान्य रूग्णालयातील रक्तपेढीत रक्तटंचाई निर्माण झाली आहे. इतकी रक्तटंचाई निर्माण झाली की संपूर्ण मे महिन्यात रक्तपेढीत एकही रक्ताची बॅग नव्हती. गरजूंनी रक्तपेढीच्या पायऱ्या रेगल्या तरी रक्ताअभावी रिकाम्या हाताने अनेकांना परतावे लागले. दरम्यान, बुधवारी औंढा तालुक्यातील वसई येथे सगनराव मगर (वय ६०) यांना हर्नियाच्या शस्त्रक्रियेसाठी ‘बी पॉझिटिव्ह’ या गटाच्या रक्ताची आवश्यकता होती. रूग्णांच्या नातेवाईकांनी सामान्य रूग्णालय, जीवनामृत योजना आणि इतरही प्रयत्न करूनही त्यांना रक्त मिळाले नाही. तेंव्हा हिंगोलीच नव्हे तर मराठवाड्यातील रक्तपेढ्या कोरड्या पडल्याचे १०४ या शासनाच्या टोल फ्री क्रमांकावर स्टिंग आॅपरेशन’ अंतर्गत फोन केल्यानंतर बुधवारी उघडकीस आले होते; मात्र रक्त निर्माण करता येत नाही, त्याचा साठा तेवढा करता येतो. बेडवर पडलेल्या गरजूंना किवा डॉक्टरांनाच रक्ताचे मोल कळते. रक्ताशिवाय कोणतेही आॅपरेशन करण्यास डॉक्टर तयार नसतात. म्हणून या समस्येला वाचा फोडण्याचे काम बुधवारी ‘लोकमत’ने केले. ‘अख्ख्या मराठवाड्यात बी पॉझिटिव्ह रक्त मिळेना’ या शिर्षकाखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले.
‘लोकमत’ द्वारे डॉक्टरांनी केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गुरूवारी दुपारपर्यंत १० दात्यांनी रक्तपेढीत येवून स्वेच्छेने रक्तदान केले. सामान्य रूग्णालय गाठून त्यांनी विनाअट रक्तदान केले. मागील महिन्यापासून कोरड्या असलेल्या या बँकेत १० बॅगा रक्ताचा साठा झाला.
दात्यांमध्ये देवानंद येवले, सुनील पिंगळकर, देवीदास शिंंदे, विशाल इंगोले, विजय काळे, विजय पाटील (सर्व रा. हिंगोली), गणेश धोंगडे (रा. सवड, ता. हिंगोली), सुरेश चाकतकर (रा. नर्सी नामदेव), देविदास शिंदे (रा. असोंदा, ता. औंढा), गजानन मगर (वसई ता. औंढा), विजय आखरे (रा. माळसगाव, ता. औंढा) यांचा समावेश आहे.
बी पॉझिटिव्हच्या दहा बाटल्या उपलब्ध
राज्य शासनाने सुरू केलेली ‘जीवन अमृत’ ही योजना कार्यान्वित आहे की नाही? हे पाहण्यासाठी १०४ या टोल फ्री क्रमांकावर बुधवारी फोन केल्यानंतर मराठवाड्यात कोठेही बी पॉझिटिव्ह गटाचे रक्त उपलब्ध नसल्याचे आले होते समोर
या बाबतचे वृत्त गुरूवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच बी पॉझिटिव्ह रक्त गट असलेले दहा दाते पोहोचले जिल्हा रुग्णालयात
‘लोकमत’च्या वृत्तामुळे गरजवंत रुग्णास शस्त्रक्रियेसाठी महत्वाच्या वेळी उपलब्ध झाले रक्त
जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत महिनाभरानंतर उपलब्ध झाले रक्त
उन्हाळ्यामुळे बहुतांश ठिकाणच्या रक्तपेढीमधील रक्तासाठा झाला आहे कमी
रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आवाहन
सगनराव मगर यांच्यावर शुक्रवारी शस्त्रक्रिया
वसई येथील सगनराव मगर यांच्या हर्नियाच्या शस्त्रक्रियेसाठी रक्त हवे असल्याने बुधवारी हा खटाटोप करण्यात आल्यानंतर गुरूवारी ‘बी पॉझिटिव्ह’ गटाच्या १० बॉटल उपलब्ध झाल्या. आता मगर यांच्यावर शुक्रवारी शहरातील खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. ‘लोकमत’च्या या विधायक पाठपुराव्याविषयी मगर यांनी आभार व्यक्त केले. तसेच राष्ट्रवादीचे मनिष आखरे, माधव कोरडे, केशव नाईक यांनीही रक्त उपलब्ध झाल्याबद्दल ‘लोकमत’चे आभार मानले.
जिल्हा रुग्णालयात का नाही रक्तसाठा?
सामान्य रूग्णालयातील रक्तपेढीत स्वस्तात रक्त मिळत असल्यामुळे गरजूंचा ओढा सामान्य रूग्णालयाकडे वाढला आहे. दिवसागणिक २५ ते ३० बॅगच्या मागणीसाठी रक्तपेढीला विचारले जाते; परंतु मागणी प्रमाणे रक्ताची आवक नसून ती अत्यंत नगण्य आहे. दिवसाला सरासरी ७ ते ८ बॅगा रक्त जमा होते. मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत वाढत असताना मागील महिनाभरात एकही रक्तदान शिबीर झालेले नाही. त्यातच सामान्य रूग्णालयात येणाऱ्या गरोदर माता, रक्तक्षय असलेल्या महिलांना रक्ताची गरज भासते. शिवाय आॅपरेशन करणाऱ्यांना देखील रक्त लागत असल्यामुळे रक्तपेढीतील साठा पूरी होवू शकत नसल्याचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. विठ्ठल करपे यांनी सांगितले.
दर तीन महिन्याला रक्तदान
हिंगोलीतील सर्पमीत्र असलेले विजय पाटील प्रत्येक तिसऱ्या महिन्यात न चुकता रक्तदान करतात. आजपर्यंत त्यांनी एकूण ७ वेळा रक्तदान केले आहे. रक्तदान हे पुण्याचे काम आहे. गरजवंताची नड भागविणे हीच ईश्वरसेवा असल्याचे विजय पाटील म्हणाले.