स्त्री रुग्णालयास बरमदे देणार सोनोग्राफी मशीन दान
By Admin | Published: June 12, 2014 12:51 AM2014-06-12T00:51:46+5:302014-06-12T01:37:50+5:30
सितम सोनवणे , लातूर शहरातील लेबर कॉलनी येथील स्त्री रुग्णालयात तंत्रज्ञ असतानाही केवळ सोनोग्राफी मशीन नसल्याने उपचारासाठी येणाऱ्या गरोदर मातांची मोठी गैरसोय होत आहे़
सितम सोनवणे , लातूर
शहरातील लेबर कॉलनी येथील स्त्री रुग्णालयात तंत्रज्ञ असतानाही केवळ सोनोग्राफी मशीन नसल्याने उपचारासाठी येणाऱ्या गरोदर मातांची मोठी गैरसोय होत आहे़ त्यामुळे या महिलांना खाजगी रुग्णालयात तपासणी करावी लागत आहे़ यासंदर्भात लोकमतमधून वृत्त प्रकाशित होताच लातुरातील स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. कल्याण बरमदे यांनी सोनोग्राफी मशीन दान देण्याची इच्छा व्यक्त केली आहे़ ही मशीन रुग्णालय प्रशासनाने स्वीकारल्यास गरोदर महिलांना बसणारा आर्थिक व मानसिक त्रास दूर होणार आहे़
सुरक्षित बाळंतपण व्हावे म्हणून शासनाच्या वतीने जननी शिशू सुरक्षा योजना गेल्या काही वर्षांपासून राबविण्यात येत आहे़ त्यामुळे त्यांचा सामान्य कुटुंबातील महिलांना मोठ्या प्रमाणात लाभ होत असल्याचे पहावयास मिळत आहे़ शहरातील लेबर कॉलनी येथे स्त्री रुग्णालय आहे़ या परिसरातील गरोदरमातांना शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय दूर होत असल्याने बहुतांशी गरोदर महिला आपल्या कॉलनीतील रुग्णालयात उपचारासाठी नेहमी ये- जा करीत असतात़
प्रशासनाच्या वतीने या रुग्णांना अद्ययावत सुविधा देण्याचा प्रयत्न करीत असले तरी येथील स्त्री रुग्णालयात गेल्या दोन वर्षांपासून सोनोग्राफी मशीन उपलब्ध नाही़ परिणामी, तपासणीसाठी आलेल्या महिलांना नजीकच्या खाजगी सेंटरचा अथवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा आधार घ्यावा लागत असे़ वास्तविक पहाता अनेक महिलांची पायी जाण्याची स्थितीही नसते़ परंतु, तपासणी मशीनच उपलब्ध नसल्याने नाईलाजास्तव मानसिक त्रास सहन करावा लागत आहे़ त्यामुळे गरोदर महिला रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे़
यासंदर्भात चौकशी केली असता प्रशासनाकडून कराराअभावी सोनोग्राफी यंत्र उपलब्ध झाले नसल्याचे सांगण्यात आले़ त्यामुळे लोकमतमधून करारात अडकले सोनोग्राफी यंत्र या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले़ या वृत्तामुळे गरोदर महिलांची तसेच त्यांच्या नातेवाईकांची होणारी अडचण जाणून शहरातील स्त्री रोगतज्ज्ञ डॉ़ कल्याण बरमदे यांनी या स्त्री रुग्णालयास सोनोग्राफी मशीन दान देण्याचा मानस व्यक्त केला आहे़ त्यामुळे आता लवकरच स्त्री रुग्णालयास सोनोग्राफी मशीन उपलब्ध होणार आहे़
ही मशीन रुग्णालयाच्या ताब्यात घेण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासही बुधवारपासून प्रारंभ झाला आहे़ विशेष म्हणजे या सोनोग्राफी मशिनची वर्षभराची दुरुस्ती करण्याची जबाबदारी डॉ़ बरमदे यांनी स्विकारली आहे़
लेबर कॉलनीतील स्त्री रुग्णालयात सोनोग्राफी मशीन उपलब्ध करुन देण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे़ काही तांत्रिक अडचणी येत आहे़ सध्याच्या स्थितीत मशीन नसल्याने गरोदर महिलांची अडचण होत आहे़ डॉ़ कल्याण बरमदे यांनी सोनोग्राफी मशिन देण्याचे सांगितले आहे़ या मशिन संदर्भातील माहिती, रितसर प्रस्ताव डॉ़ बरमदे यांनी स्त्री रुग्णालयाकडे सादर करावा़ त्याची माहिती घेऊन त्यावर निर्णय घेतला जाईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ बी़ एस़ कोरे यांनी सांगितले़