"जास्त हुशाऱ्या मारू नका, अडीच वर्षांनंतर मंत्री म्हणून मी पुन्हा येईल"; सत्तारांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 18:42 IST2024-12-19T18:40:50+5:302024-12-19T18:42:05+5:30
मंत्रीपद हुकले तरी नाराजी नाही; अडीच वर्षांनंतर मंत्री बनण्याचा अब्दुल सत्तार यांना विश्वास

"जास्त हुशाऱ्या मारू नका, अडीच वर्षांनंतर मंत्री म्हणून मी पुन्हा येईल"; सत्तारांचा इशारा
सिल्लोड: सिल्लोड विधानसभेच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून होते. मी विजयी झाल्यानंतर मतदार आणि कार्यकर्त्यांची मंत्रीपदाची अपेक्षा होती. मात्र, पक्षाने ठरवलेल्या अडीच वर्षांच्या फॉर्मुल्यामुळे मंत्रीपद स्वीकारण्यापासून थांबावे लागले. मंत्रीपद मिळाले नाही, म्हणून मी नाराज नाही. सरकार आपले आहे आणि सिल्लोड- सोयगाव मतदारसंघाच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही, अशी ग्वाही माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली. तसेच "जास्त हुशाऱ्या मारू नका, अडीच वर्षांनंतर मी पुन्हा येईल," असा इशारा देखील त्यांनी विरोधकांवर टीका करताना दिला.
गुरुवारी सिल्लोड शहरातील सेना भवन येथे दुपारी १२ वाजता झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात सत्तार यांनी मंत्रीमंडळ विस्तारानंतर पहिल्यांदाच कार्यकर्ते आणि पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडून देणाऱ्या मतदारांचे आभार मानले. हजारो कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला. "विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी जातीवादाचा प्रचार केला, पण मतदार माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे होते. चौथ्यांदा विजयी होणे हा माझा नाही, तर मतदारांचा विजय आहे," असे सत्तार म्हणाले.
यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, कृउबा समितीचे सभापती केशवराव पा. तायडे, देविदास लोखंडे, प्रभाकर काळे, माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर, श्रीराम महाजन, रामदास पालोदकर, श्रीरंग पा.साळवे, मारुती वराडे, पंकज जयस्वाल, अजगर झारेकर, पपींद्र पालसिंग वायटी, इशानसिंग वायटी, हसन पटेल, सतीश ताठे, रुपेश जयस्वाल, संजय जामकर, माजी नगराध्यक्ष राजश्री निकम, दुर्गाताई पवार, दिपाली पवार, मेघा शहा आदींची उपस्थित होते.
२०२९ च्या निवडणुकीची तयारी आतापासूनच
"निवडणुका जवळ आल्या की विरोधक मैदानात उतरतात आणि पाच वर्षे लोकांना वाऱ्यावर सोडतात. पण मी तसे करणार नाही. जनतेसाठी मी २४ तास ३६५ दिवस उपलब्ध आहे. आता राज्याची जबाबदारी नसल्याने पूर्णवेळ मतदारसंघासाठी काम करीन," असे त्यांनी आश्वासन दिले. सत्तार यांनी काही गावांमध्ये मताधिक्य घटल्याबाबत चिंता व्यक्त केली. "कोट्यवधी रुपयांचा निधी आणून विकासकामे केली, तरीही मताधिक्य कमी झाले, याचे आत्मचिंतन करणार आहे. गावागावांत जाऊन कार्यकर्ते आणि मतदारांशी संवाद साधणार आहे. आजपासूनच २०२९ च्या निवडणुकीची तयारी सुरू करतो आहे," असेही ते म्हणाले.
अडीच वर्षांत पुन्हा मंत्रीपदाचा निर्धार
"माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे. मंत्रीपद मिळाले नाही म्हणून विरोधकांनी आनंद साजरा करण्याची गरज नाही. अडीज वर्षांनंतर माझे पुनरागमन होईल," असा सत्तार यांनी ठाम विश्वास व्यक्त केला.