घरटे तोडू नका, पक्षालाही होतो उष्माघात; जमिनीवर कोसळलेल्या ऑस्ट्रेलियन पोपटास जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 12:13 PM2023-05-23T12:13:15+5:302023-05-23T12:16:42+5:30
गेल्या दोन आठवड्यांपासून तापमानाने चाळिशी पार केली आहे. त्यामुळे मानवासहीत पशू पक्ष्यांचीही उन्हाने लाहीलाही होत आहे.
पैठण : उडता उडता उष्माघाताने जमिनीवर पडलेल्या ऑस्ट्रेलियन पोपटास पैठण येथील पक्षीमित्र प्रा. संतोष गव्हाणे यांच्या सतर्कतेमुळे सोमवारी जीवदान मिळाले आहे. गव्हाणे यांनी प्राथमिक उपचार केल्याने बरे वाटलेल्या ऑस्ट्रेलियन पोपटाने पुन्हा आकाशात भरारी घेतली.
गेल्या दोन आठवड्यांपासून तापमानाने चाळिशी पार केली आहे. त्यामुळे मानवासहीत पशू पक्ष्यांचीही उन्हाने लाहीलाही होत आहे. उन्हाचा चटका बसू लागल्याने शहरी भागातील पक्ष्यांचे जीवनमान धोक्यात आले आहे. उन्हामुळे डीहायड्रेशनचा त्रास झाल्याने पक्षी रस्त्याच्या कडेला पडण्याचे प्रमाण वाढले आहे. पैठण येथे सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ऑस्ट्रेलियन पोपट प्रा. संतोष गव्हाणे यांच्या घराच्या छतावर पडला. प्रा. गव्हाणे यांनी या पक्ष्याला तातडीने उचलून सावलीत आणून त्यास पाणी पाजले. दरम्यान, त्याच्या शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी हळूहळू पोपटाच्या अंगावर पाणी शिंपडले. पोपटाला खायला घातले. यामुळे थोड्याच वेळात पोपट ताजातवाना होऊन पुन्हा आकाशात उडून गेला.
पक्ष्यांचे घरटे तोडू नका
उन्हाचा जास्त फटका बसल्याने पक्ष्यांच्या शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे उडताना अचानक पक्षी खाली पडतात, असे पक्षीमित्र संतोष गव्हाणे यांनी सांगितले. विशेषतः ज्या पक्ष्यांची घरटी मोडली जातात, अशा पक्ष्यांना या समस्येला सामोरे जावे लागते. यामुळे या काळात कुणीही पक्ष्यांचे घरटे तोडू नये, घराच्या छतावर पाण्याची सोय करावी.
-संतोष गव्हाणे, पक्षिमित्र