हताश होऊ नका, सावकाराच्या जबरदस्तीला लगाम; बळकावलेली शेती मिळते परत !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 01:10 PM2022-05-24T13:10:42+5:302022-05-24T13:15:02+5:30
ही जमीन परत मिळू शकते. मात्र यासाठी पुरावे आवश्यक असतात.
- स. सो. खंडाळकर
औरंगाबाद : सावकाराने शेतकऱ्याची जमीन बळकावली असेल आणि संबंधित शेतकऱ्याने पंधरा वर्षांच्या आत तशी तक्रार जिल्हा निबंधकांकडे केली, तर ही जमीन परत मिळू शकते. मात्र यासाठी पुरावे आवश्यक असतात.
१) पंधरा वर्षांच्या आत करा अर्ज
तक्रार देतानाच्या आधी पंधरा वर्षांत व्यवहार व्हायला हवा. यासंदर्भात २०१४ साली कायद्यात संशोधन झाले.
२) २०१४ पासून ४२ लोकांना जमिनी परत केल्या
२०१४ पासून औरंगाबाद जिल्ह्यात ४२ शेतकऱ्यांना जमिनी परत करण्यात आल्या. अर्थात यात अपील करण्याचीही सोय आहे.
३) तक्रार कोठे व कशी करायची?
जिल्हा उपनिबंधकांच्या कार्यालयात, सहाय्यक निबंधकांच्या कार्यालयात तक्रार करता येते. गोपनीय स्वरूपात स्वत: तक्रारदाराने तक्रार करायला हवी. विशेषत: यात पुरावे देणे गरजेचे आहे.
४) जिल्ह्यात नोंदणीकृत ११५ सावकार
मार्च २०२२ अखेर औरंगाबाद जिल्ह्यात ११५ नोंदणीकृत सावकार आहेत. अनेक तालुक्यांमध्ये नोंदणीकृत सावकार नाहीत.
५) किती टक्क्याने सावकारी करण्याचा परवाना?
तारण कर्जाला प्रतिवर्षी ९ टक्के व्याजदर आहे, तर विनातारण कर्जाला प्रतिवर्षी १२ टक्के व्याजदर आकारून सावकारी करता येते. शेतकऱ्यांव्यतिरिक्त कुणीही कर्ज घेतले असेल तर तारण कर्जाला १५ टक्के व विनातारण कर्जाला १८ टक्के व्याजदर आकारण्याची अट आहे.
अर्ज करतानाच्या आधीच्या पंधरा वर्षांपूर्वी सावकाराने जमीन बळकावली असेल, तर तक्रारदार शेतकऱ्याला त्याची शेती परत करता येऊ शकते. अर्थात स्वत: शेतकऱ्याने पुराव्यानिशी तक्रार द्यायला हवी. यासंदर्भात जागरुकतेची आवश्यकता आहे.
- अनिलकुमार दाबशेडे, जिल्हा उपनिबंधक, औरंगाबाद