"नंबर दोनचे धंदे..., माझे सगळे व्यवहार रेकॉर्डवर; खैरेंचं डिपॉझिट वाचलं तरी बरं होईल", भुमरेंचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 11:40 AM2024-04-25T11:40:49+5:302024-04-25T11:43:05+5:30
चंद्रकांत खैरे यांनी वैजापूरमध्ये टक्केवारीचे पैसे आणि दारूची दुकानं म्हणत भुमरेंवर निशाणा साधला होता. त्यावर आता भुमरे यांनीही पलटवार केला आहे.
छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी शिवसेनेकडून (शिंदे गट) संदिपान भुमरे यांना उमेदवारी दिल्यानंतर, आता खऱ्या अर्थाना निवडणूक प्रचाराला रंग चढताना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, शिवसेनेच्या फुटीनंतर, छत्रपती संभाजीनगरात शिवसेना विरुद्ध शिवसेना, अशी लढत पहिल्यांदाच होणार आहे. या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत दोन्ही शिवसेनेचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. चंद्रकांत खैरे यांनी वैजापूरमध्ये टक्केवारीचे पैसे आणि दारूची दुकानं म्हणत भुमरेंवर निशाणा साधला होता. त्यावर आता भुमरे यांनीही पलटवार केला आहे.
यासंदर्भात बोलताना भुमरे म्हणाले, "चार तारखेला कळेल, कुणी टक्केवारी घेतली? काय घेतली? आणि जिल्ह्यातले कार्यकर्त्ये सांगतील ना भुमरेंनी किती पैसे घेतले. खैरे तर आरोप करणारच. खैरेंकडे दुसरं राहिलंच काय? खैरेंनी हे सांगावं की, भुमरेने विकासाची कामं केली नाहीत. भुमरे पालकमंत्री असताना, कॅबिनेटमंत्री असताना महाराष्ट्रात, जिल्ह्यात, शहरात काम केलं नाही, ही कामं सांगा. हे काय आहे, टक्केवारी खाल्ली, टक्केवारी घेतली. याला काही पुरावा आहे का? राहिला विषय व्यवसाय कुणी कोणता करावा? किती करावा? हे सर्व रेकॉर्डला आहे. आरोप करायला काही लागत नाही. पण कुणी कोणता व्यवसाय करावा, काय करावा, हा ज्याचा त्याचा विषय आहे."
"मला एक सांगायचे आहे, नंबर दोनचे धंदे करत नाही. हे शासन मान्य आहे. आम्ही शासनाला महसूल भरतो. म्हणून मला सांगायचं आहे की रेकॉर्डला सर्व काही आहे. आता खैरेंच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. खैरेंचं संतुलन बिघडलं आहे. आज त्यांना कळेल त्यांची परिस्थिती काय आहे ते? जेव्हा आम्ही भाजप शिवसेना सोबत होतो, तेव्हा त्यांची रॅली कशी निघत होती? खैरेंच्या सभा कशा होत होत्या? आणि आज त्यांची परिस्थइती कशी आहे?" असा प्रश्न भुमरे यांनी केला. ते एबीपी माझा सोबत बोलत होते.
"आज खैरेंसोबत काँग्रेस नाही. शरद पवारांची राष्ट्रवादी नाही आणि उबाठाचे कार्यकर्त्येही त्यांच्यासोबत नाहीत. हे सर्वजण खैरेंसोबत आहेत, पण मनाने माझ्यासोबत आहेत. त्यामुळे खैरेंचे संतुलन बिघडले आहे. खैरे काय आरोप करतात, याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. खैरेंना म्हणावं विकासावर बोला," असेही भुमरे म्हणाले.