कमी टक्क्यात कर्जाचा मेसेज आला तर ॲप डाऊनलोड करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:04 AM2021-07-26T04:04:17+5:302021-07-26T04:04:17+5:30

(डमी - ९६७) औरंगाबाद : कोराेनाच्या दुसऱ्या लाटेनंतर बेरोजगारीचे प्रमाण बरेच वाढले आहे. पैसे उकळण्यासाठी सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या क्लुप्त्या ...

Don't download the app if you get a low loan message | कमी टक्क्यात कर्जाचा मेसेज आला तर ॲप डाऊनलोड करू नका

कमी टक्क्यात कर्जाचा मेसेज आला तर ॲप डाऊनलोड करू नका

googlenewsNext

(डमी - ९६७)

औरंगाबाद : कोराेनाच्या दुसऱ्या लाटेनंतर बेरोजगारीचे प्रमाण बरेच वाढले आहे. पैसे उकळण्यासाठी सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या क्लुप्त्या शोधून काढत आहेत. सर्वसामान्य नागरिक या अफलातून ऑफर्सला बळी पडत असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. शहरातील सायबर पोलिसांकडे दररोज दोन ते चार नागरिक तक्रार घेऊन येत आहेत. देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात बसून सायबरचा हा भयानक खेळ खेळणाऱ्यांपर्यंत पोलीस पुरावे नसल्यामुळे पोहचू शकत नाहीत. कमी टक्क्यांमध्ये कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या ऑफर्स आल्या तर त्यांचे ॲप डाऊनलोड करू नका, असे आवाहनही पोलिसांनी केले.

कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकही आर्थिकरित्या संकटात सापडले आहेत. फावल्या वेळेत अनेकजण सर्चिंग करीत असतात. कमी टक्क्यांमध्ये कर्ज देण्याचे आमिष दाखवून लुबाडण्याचे प्रमाण वाढतच आहे.

ॲप डाऊनलोड करताच बँकेतून रक्कम गायब

सायबर हॅकर्स अत्यंत चाणाक्ष असतात. दररोज गरजवंत ते शोधत असतात. त्यांचा ॲप डाऊनलोड करताच संबंधिताच्या बँकेतील सर्व रक्कम आपोआप गायब होते. मोबाईलवर पैसे गेल्याचा जेव्हा मेसेज येतो तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते. फसवणूक झालेले ९९ टक्के नागरिक हॅकर्सचा ॲप खरा किंवा खोटा याची साधी शहानिशाही कुठे करीत नाहीत.

या आमिषांपासून सावधान

केंद्र, राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या नावावर पैसे देण्याचे आमिष.

आमच्या कंपनीने तुमची भाग्यवान विजेते म्हणून निवड केली आहे, तुम्हाला एवढेच करायचे आहे, म्हणून आपल्या मायाजालामध्ये ओढतात.

सोशल मीडियावर वेगवेगळ्या ठिकाणी आकर्षक पोस्ट टाकण्यात येते. त्याची लिंक क्लिक केली तर गुन्हेगारांचे फावते.

यांच्याप्रमाणे तुम्ही सुद्धा फसू शकता

केस-१- केंद्र शासनाकडून बेरोजगार भत्ता देण्यात येत असल्याची पोस्ट पाहून लिंकमध्ये गेलो. त्यांनी ज्या पद्धतीने सूचना दिल्या तसे करीत गेलो. त्यानंतर बँकेत होते नव्हते सर्व पैसे गायब झाले.

केस-२- तुमचे बँक खाते बंद होणार आहे, एटीएमही बंद पडेल. तुमचा एटीएमचा क्रमांक आणि पासवर्ड लवकर द्या म्हणून फोन आला. पासवर्ड देताच पैसे गायब झाले.

ही घ्या काळजी

सोशल मीडियावर झटपट पैसे मिळवून देणाऱ्या भूलथापांना बळी पडू नका.

कोणतीही लिंक क्लिक करण्यापूर्वी दहा ठिकाणी खातरजमा करूनच निर्णय घ्या.

अनोळखी व्यक्तीला आपली, बँकेची कोणतीही माहिती अजिबात देऊ नका.

सायबर अधिकाऱ्यांचे मत

सोशल मीडिया, मोबाईलवर अधूनमधून अशा पद्धतीचे मेसेज येतात. विनाकारण त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. शंका आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. सावधगिरी बाळगलेली कधीही उत्तम असते.

गीता बागवडे, पोलीस निरीक्षक, सायबर सेल .

Web Title: Don't download the app if you get a low loan message

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.