Uddhav Thackeray: 'धीर सोडू नका, मी सोबत आहे'; उद्धव ठाकरेंसमोर शेतकऱ्यांनी मांडली व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 03:01 PM2022-10-23T15:01:14+5:302022-10-23T15:03:05+5:30
उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावरुन आता राजकीय टीका टिपण्णी सुरू आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी २० मिनिटांचा दौरा म्हणत टीका केली
औरंगाबाद - राज्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे आजपासून औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानाचा आढावा घेऊन त्यांना शासकीय मदत तातडीने मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. उद्धव ठाकरे दुपारी १ वाजत औरंगाबाद विमानतळावर पोहोचले. यावेळी, त्यांचं जल्लोषात स्वागतही करण्यात आलं. त्यानंतर, उद्धव ठाकरेंनी नियोजनानुसार दहेगाव आणि पेंढापूर येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी, शेतकऱ्यांनी आपली नुकसान झाल्याचं सांगत, व्यथाच मांडली.
उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावरुन आता राजकीय टीका टिपण्णी सुरू आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी २० मिनिटांचा दौरा म्हणत टीका केली. तर, शरद पवारांनी या दौऱ्याचं समर्थन केलं आहे. उद्धव ठाकरे दुपारी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले, त्यावेळी, शेतकऱ्यांनी ठाकरेंसमोर आपली व्यथा मांडली. जे सुरु आहे ते सर्व दुर्दैवी आहे, पण तुम्हीं काळजी करू नका, धीर सोडू नका. मी सोबत आहे. असे म्हणत त्यांच्यात विश्वास बांधण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला.
जे सुरु आहे ते सर्व दुर्दैवी आहे, पण तुम्हीं काळजी करू नका, धीर सोडू नका. मी सोबत आहे.
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) October 23, 2022
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या संभाजीनगर गंगापूर तालुक्यामधील दहेगाव शिवार व पेंढापूर येथे पाहणी केली. pic.twitter.com/AxbVmFmY8e
विमानतळावर जल्लोषात स्वागत
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर असून औरंगाबादेतील नेत्यांकडून चिखलठाणा विमानतळावर त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यावेळी, मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी विमानतळावर गर्दी केली होती, येथील शिवसैनिकांना अभिवादन करुन उद्धव ठाकरे पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी दहेगावमध्ये गेले होत. तेथील, शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेत शेतकऱ्यांना धीर देण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं.