मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
By बापू सोळुंके | Published: September 26, 2024 09:09 PM2024-09-26T21:09:51+5:302024-09-26T21:10:19+5:30
छत्रपती संभाजीराजे, माजी खा. राजू शेट्टी, प्रहार पक्षाचे प्रमुख आ. बच्चू कडू यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली.
छत्रपती संभाजीनगर: मनोजराजव आता कोणालाही भेटायचं नाही, तब्येतेची काळजी घ्या.. असा सल्ला युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
छत्रपती संभाजीराजे यांनी सहाव्यांदा ९ दिवस उपोषण केल्यामुळे प्रकृती खालावल्याने शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेले मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट यांनी घेतली. यावेळी त्यांच्यासोबत माजी खा. राजू शेट्टी, प्रहार पक्षाचे प्रमुख आ. बच्चू कडू, शंकर अण्णा धोंडगे यांची उपस्थिती होती. यावेळी या नेत्यांनी जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर डॉक्टरांकडूनही त्यांच्या उपचारासंदर्भात माहिती घेतली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, जरांगे यांची प्रकृती ठणठणीत होईपर्यंत त्यांनी कोणालाही भेटू नये, असे आपण त्यांना सांगितले आहे. शिवाय त्यांना भेटण्यासाठी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांनी रुग्णालयात गर्दी करू नये असे आवाहन करतो. डॉक्टरांनीही आता त्यांच्यापर्यंत कोणालाही जाऊ देऊ नये,असे आपण सांगितले.
आ. बच्चू कडू म्हणाले की, मी एकदा अकरा दिवस उपोषण केले होते. तेव्हापासून ठरवलं की, काहीही झाले तरी उपोषण करायचे नाही. कारण आपण तंदुूरूस्त असेल तर काहीही करणे शक्य होते.
जरांगे यांच्या किडनी, लिव्हरवर सूज,युरीक ॲसिड वाढले
९ दिवस केलेल्या उपोषणामुळे मनोज जरांगे यांच्या किडनी आणि लिव्हरवर सूज आली आहे. सोबतच त्यांचे युरीक असिड वाढले, त्यांचे शरिर डिहायड्रेशन झाल्याचे त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. विनोद चावरे यांनी गुरूवारी पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले की, त्यांना येथे दाखल केल्यानंतर त्यांचे सिटीस्कॅन करण्यात आले, सोनोग्राफी करण्यात आली, टु डी ईको तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये त्यांच्या शरिरामध्ये खूप बदल झाल्याचे दिसून आले. त्यांना पुढील १२ ते १४ दिवस रुग्णालयात उपचार घ्यावे लागेल. पुढील सात दिवस त्यांनी कोणालाही भेटू नये,असा सल्ला देण्यात आला.