हॉटेल उघडले म्हणून जिभेचे लाड नको, आला पावसाळा, पोट सांभाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:03 AM2021-07-16T04:03:27+5:302021-07-16T04:03:27+5:30
औरंगाबाद : कमी-जास्त प्रमाणात सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाळा सक्रिय झाला आहे. कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे बंद असलेली हॉटेल्स आता सकाळी ७ ...
औरंगाबाद : कमी-जास्त प्रमाणात सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाळा सक्रिय झाला आहे. कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे बंद असलेली हॉटेल्स आता सकाळी ७ ते दुपारी ४ यावेळेत उघडी राहत आहेत. नजीकच्या काळात ही वेळ वाढू शकते. मात्र, पावसाळ्यात पोटाचे आजार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे बाहेर खाणे या दिवसांत टाळायलाच हवे.
पावसाळ्यात हे खायला हवे....
* ज्वारी अधिक उडिदाची भाकर पचायला सोपी असते, ती खावी.
*तांदूळ- तळणीची भाकरी खावी.
*रात्रीचे जेवण झोपण्याच्या अर्धा तास आधी करावे.
*पचनसंस्था उत्तम राहण्यासाठी गवती चहा, अद्रक, तुळस व ओव्याची पाने खावीत.
*पाणी गरमच प्यावे.
*बिया असलेल्या भाज्या खाव्यात. भेंडी, दूधी भोपळा, कच्चे टोमॅटो, फ्लॉवर, ढेमसे अशा भाज्या खाव्यात.
*उपवास करणाऱ्यांनी शाबुदाणा पचायला जड असल्याने राजगिऱ्याचे थालीपीठ वगैरे असे पदार्थ खावेत.
*जेवण झाल्यानंतर पेरू, पपई खावेत. त्याचा जास्त फायदा होतो.
पावसाळ्यात हे खाणे टाळायला हवे...
*मांसाहार टाळावा.
*फास्ट फूड, तळलेले पदार्थ, इडली, ढोकळा असे पचनसंस्थेत ताण येतील असे पदार्थ खाऊ नयेत.
* गॅसेस होऊ नयेत यासाठी चवळी, वाटाणे खाऊ नयेत.
* उघड्यावरचे पदार्थ खाण्याचे टाळावे.
........................
रस्त्यावरचे अन्न नकोच
पावसाळ्यात उघड्यावरचे अन्नपदार्थ खाणे म्हणजे आजाराला निमंत्रण देणेच होय. त्यामुळे रस्त्यावरचे अन्न टाळावेच. तळलेल्या पदार्थांमधून पोट बिघडण्याची अनेक उदाहरणे आहेत. या पदार्थांवर माश्यांचा सर्रास वावर असतो. असे पदार्थ खाल्ल्याने रोगराई वाढल्याशिवाय राहणार नाही.
..................
सावधान, पावसाळ्यात पचनक्रिया मंद होते...
पावसाळ्यात पचनक्रिया मंद होते. पचनसंस्थेशी निगडित आजार बळावतात. उदा. - जुलाब होणे, कावीळ होणे, कॉलरा होणे. हे आजार टाळण्यासाठी आहारावर नियंत्रण असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी उघड्यावरचे अन्नघटक खाणे टाळावे. पालेभाज्या टाळाव्यात. त्यांचा सूप घेणे चांगले. पांढऱ्या रक्तपेशीवर परिणाम होऊ नये म्हणून, व्हायरल इन्फेक्शन टाळण्यासाठी उघड्यावरचे अन्न घटक टाळलेच पाहिजेत.
- डॉ. अलका कर्णिक, आहारतज्ज्ञ, औरंगाबाद
...............