वन्यजीवांशी खेळू नका, पोपटाला खाऊ घालताना व्हिडीओ शेअर कराल तर कोठडीत जाल !
By साहेबराव हिवराळे | Published: July 18, 2024 08:32 PM2024-07-18T20:32:26+5:302024-07-18T20:33:21+5:30
भारतीय वंशाचे पशू-पक्षी परवान्याशिवाय पाळता येत नाहीत.
छत्रपती संभाजीनगर : विदेशी प्रजातीचे पक्षी तुम्ही आवडीने पाळू शकता; परंतु भारतीय वंशाचे पशू-पक्षी तुम्ही परवान्याशिवाय पाळू शकत नाहीत. वन्यजीवांसोबत व्हिडीओ काढून तो शेअर करण्याची चढाओढ पाहायला मिळते. पण, तसे केले तर गुन्हा दाखल होऊ शकतो. दंडात्मक कारवाईदेखील होते. वन्यजीवांना विनाकारण पाळून कोंडून ठेवणे, त्यांचे प्रदर्शन करणे महागात पडू शकते. वन कायद्याने गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.
वन्यजीवांशी खेळू नका
भारतीय वंशाचे पशू-पक्षी परवान्याशिवाय पाळता येत नाहीत. असे असतानादेखील अनेक जण पोपट पिंजऱ्यात बंद करून ठेवतात आणि त्यांना अंगा - खांद्यावर खेळवितात. त्यांचे प्रदर्शन करीत तो व्हिडीओदेखील व्हायरल करणारे महाभाग पाहण्यास मिळतात. असे कोणतेही प्रकार करू नयेत. वन्यजीवांना खाऊ घालू नका वन्यजीवाला खाऊ घालून त्याला पाळीव बनवू नका. पर्यावरण राखण्यासाठी त्याचे उडणे, बागडणे, तसेच स्वत:चे अन्न स्वत: शोधून खाणे, त्याच्या आरोग्यासाठी योग्य होय. त्याला अन्न टाकून पाळीव बनविणे गुन्हा ठरतो.
...मग जेलची हवा खा
वन्यजीवांना पाळण्यासाठी रीतसर परवानगी घ्यावी लागते. ती असेल तर त्याचे पालनपोषण करू शकता; पोपटच काय, तर इतर कोणताही पक्षी, प्राणी तुमच्या ताब्यात ठेवू नका. खिसा रिकामा होईल अन् जेलचीही हवा खावी लागेल.
- डॉ. किशोर पाठक, मानद वन्यजीव सदस्य