'राज ठाकरेंच्या भाषणावर बोलू नका', इम्तियाज जलील यांच्या MIM कार्यकर्त्यांना सूचना; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 02:02 PM2022-04-03T14:02:57+5:302022-04-03T14:03:38+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्याचा प्रश्न उपस्थित करत मशिदीवरील भोंगे खाली उतरले नाहीत तर त्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावू असा इशारा दिला आहे.
औरंगाबाद
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्याचा प्रश्न उपस्थित करत मशिदीवरील भोंगे खाली उतरले नाहीत तर त्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावू असा इशारा दिला आहे. मशिदीवरील भोंगे खाली उतरवावे लागतील, त्याचबरोबर माझा मुस्लिमांच्या प्रार्थनेला विरोध नाही. ज्या मशिदीच्या बाहेर भोंगे लागलेले असतील. त्या मशिदी समोर दुप्पट स्पीकर लावून त्यावर हनुमान चालीसा लावा असं काल राज ठाकरेंनी त्यांनी वक्तव्य केलं होतं. त्यावर राष्ट्रवादी, शिवसेना नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. पण असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षानं मात्र राज ठाकरेंच्या भाषणावर कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
"राज ठाकरेंच्या भाषणावर कोणतीही प्रतिक्रिया न देण्याच्या सूचना मीच महाराष्ट्रातील आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. सध्या आम्हाला त्यावर काही बोलायचं नाहीय", असं इम्तियाज जलील म्हणाले आहेत. यामागचं कारण विचारलं असता त्यावर आम्ही वेळ आल्यावर बोलू आता काही बोलणार नाही, असा सूचक इशारा देखील जलील यांनी दिला. सध्या मात्र राज ठाकरेंच्या कोणत्याही वक्तव्यावर बोलायचं नाही अशी भूमिका जलील यांनी घेतली आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी पार्क येथे पक्षाच्या वार्षिक गुढीपाडवा मेळाव्याला काल संबोधित केलं. मशिदींतील लाऊडस्पीकरबाबत सरकार काही निर्णय घेणार नसेल, तर मशिदींसमोर दुप्पट लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसाचा जप करू, असा इशारा राज ठाकरेंनी दिला. मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील मशिदी आणि मदरसांची पोलिसांनी नीट तपासणी केल्यास त्यांना अनेक गोष्टी कळतील, असेही ते म्हणाले. तसंच ज्यापद्धतीनं ईडी, आयकर आणि सीबीआयच्या धाडी पडत आहेत. अशा धाडी मदरशांवर घाला अशी माझी पंतप्रधान मोदींना विनंती आहे, असं राज ठाकरे म्हणाले. पाकिस्तान आणि बांगलादेशातून अनेक मुस्लिम मुंबईत येऊन स्थायिक झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.