'हात जोडून विनंती करतो, मोठ्या भावाबद्दल असं बोलू नका'; चंद्रकांत खैरेंचे राज ठाकरेंना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 06:53 PM2022-07-24T18:53:10+5:302022-07-24T18:55:22+5:30
'राजकारणात पुत्र प्रेम असतेच, आपल्याला लढाई कोणाबरोबर लढायची हे लक्षात ठेवले पाहिजे.
औरंगाबाद: महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर खोचक टीका केली होती. एका वृत्तवाहिनीशी बोलताना राज म्हणाले होते की, 'उद्धव ठाकरे हे विश्वास ठेवण्याच्या कामाचे नाहीत.' त्यावर आता शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी राज यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
'तुमच्यामुळेही शिवसेना फुटली'
मीडियाशी संवाद साधताना खैरे म्हणाले, 'उद्धव ठाकरे हे राज यांचे मोठे भाऊ आहेत, त्यामुळे राज ठाकरेंनी त्यांच्याबद्दल अशी टीका करणे योग्य नाही. मी आता राज ठाकरेंना हात जोडून विनंती करतो, मोठ्या भावाबद्दल असे काही बोलू नका. शिवसेना जेव्हा फुटली होती, तेव्हा राज ठाकरे हेदेखील त्याला कारणीभूत होते. त्यावेळी ते औरंगाबादेत आले असतांना त्यांचा मलाही फोन आला होता. तेव्हा त्यांनी मला मी तुम्हाला माझ्याकडे बोलवतं नाही, पण माझ्याकडे येणाऱ्या कार्यकर्त्यांना तुम्ही रोखू नका, असे सांगतिले होते.'
'राजकारणात पुत्रप्रेम असतेच'
'आपल्याला लढाई कोणाबरोबर लढायची हे लक्षात ठेवले पाहिजे. आम्ही पाहिले आहे, उद्धव ठाकरेंनी आणि तुम्ही पक्षासाठी किती काम केले आहे. आपण ठाकरे आहात आणि लोक ठाकरे परिवाराला मानतात. पुत्र प्रेमामुळे शिवसेना फुटली हा त्यांचा आरोप चुकीचा आहे. राजकारणात पुत्र प्रेम असतेच, आता ज्या एकनाथ शिंदे यांनी बंड केले, त्यांच्या मुलालादेखील शिवसेनेने खासदारकी दिली होती. तरीदेखील त्यांनी शिवसेनेशी गद्दीर केली,' असंही खैरे म्हणाले.
काय म्हणाले होते राज ठाकरे ?
काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे म्हणाले, 'उद्धव ठाकरे हे बोलतात वेगळं आणि आणि करतात वेगळं, त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास ठेवण्यासारखे काही नाही. उद्धव यांच्याबद्दल अख्ख्या महाराष्ट्राला आणि देशाला जेवढी माहिती नाही तेवढ्य़ा जवळून मला माहिती आहे. शिवसेना फुटण्याचे कारण पुत्रप्रेम होते, बाळासाहेबांच्या पुत्रप्रेमापोटीच शिवसेना फुटली,' असं राज म्हणाले होते.