आम्हाला नियम शिकवू नका, अन्यथा जेलमध्ये टाकू; उशिरा येणाऱ्या मुख्याध्यापिकेची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 10:28 AM2022-03-25T10:28:38+5:302022-03-25T10:28:56+5:30
वेरुळ शिक्षकांचे शाळेत उशिरा येणे सुरुच; शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता पांडे या औरंगाबादहून अप-डाऊन करत असल्याने त्या शाळेत नेहमी उशिरा येतात, असा पालकांचा आरोप आहे.
वेरूळ : जि.प. केंद्रीय प्रा. शाळेच्या मुख्याध्यापकांसह काही शिक्षक नेहमीच शाळेत उशिरा येतात. त्यामुळे शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (दि.२३) गांधीगिरी मार्गाने उशिरा आल्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले होते. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि.२४) किमान त्यांनी वेळेवर शाळेत येणे अपेक्षित होते. मात्र, त्या अर्धा तास उशिरा शाळेत दाखल झाल्या. याबाबत शालेय शिक्षण समितीने त्यांना जाब विचारल्यानंतर आम्हाला नियम शिकवू नका, आमच्यापरीने शाळा करू द्या, अन्यथा जेलमध्ये टाकू. अशी धमकी त्यांनी दिली. हे पाहून उपस्थित सर्वजण अवाक् झाले.
वेरुळच्या जि.प. शाळेत २८१ विद्यार्थी शिकत असून नऊ शिक्षक येथे कार्यरत आहेत. शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता पांडे या औरंगाबादहून अप-डाऊन करत असल्याने त्या शाळेत नेहमी उशिरा येतात, असा पालकांचा आरोप आहे. मुख्याध्यापिकाच उशिरा येत असल्याने इतर शिक्षकही उशिरा येतात म्हणून शालेय समितीने बुधवारी मुख्याध्यापिका पांडे यांना उशिरा आल्याबद्दल गांधीगिरी मार्गाने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दुसऱ्या दिवशी सर्व शिक्षक लवकर येतील असा सर्वांना अंदाज होता, मात्र मुख्याध्यापक स्वत: उशिरा शाळेत आल्या. इतर शिक्षकांपैकी चार शिक्षकही उशिरा आले. याबाबत शालेय समितीच्या सदस्यांसह पालकांनी त्यांना जाब विचारला. त्यावर त्या प्रचंड चिडल्या व ‘हे शासकीय कार्यालय असून तेथे आम्हाला तुम्ही नियम दाखवायचे नाही. आम्हाला आमच्या पद्धतीने शाळा करू द्या, अन्यथा जेलमध्ये टाकू’ अशी धमकी दिली. या गोंधळात सरपंचही तेथे हजर झाले. त्यामुळे संतप्त पालकांनी शिक्षकच शाळेत उशिरा येत असेल तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला कोण जबाबदार राहील, तसेच शाळेत पंधरा दिवसांपासून प्रार्थना, राष्ट्रगीत होत नाही, यावर सरपंच कुसुम मिसाळ यांनी मुख्याध्यापिका पांडे यांना चांगलेच सुनावले. त्यावर आज प्रशिक्षण असल्याने आम्ही उशिरा आलो आहे. यापुढे दररोज शाळेत वेळेच्या दहा मिनिटे अगोदर हजर राहत जाऊ, असे मुख्याध्यापिका पांडे यांनी सांगितले. यावेळी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष, उपाध्यक्षा वर्षा घोडके यांच्यासह सदस्य, पालकांची उपस्थिती होती.
जि.प. शाळेत गोरगरिबांची मुले शिकतात. शाळेत वेळेवर येणे शिक्षकांना बंधनकारक आहे. यासोबतच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास कसा होईल, यावर मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षकांनी भर दिला पाहिजे. तसेच चुका होऊ नये यासाठी खबरदारी घेतली पाहिजे.
- कुसूमताई मिसाळ, सरपंच, वेरुळ
गेल्या काही दिवसापासून वेरुळ येथील जि.प. केंद्रीय प्रा. शाळेतील शिक्षक आणि शालेय समितीच्या पदाधिकाऱ्यांचे वाद सुरू असल्याची माहिती मिळत आहे. या वादावर लवकरच बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल.
- सचिन सोळंकी, गटशिक्षणाधिकारी, पं. स. खुलताबाद